लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा :वनविभागाच्यायवतमाळ वृत्तातील पांढरकवडा, पुसद, यवतमाळ व वाशिम डिव्हीजनमधील तीन वर्षे पूर्ण झालेल्या बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या ३० टक्के मर्यादेत बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, याही वेळी कार्यालयातील बाबूंनी वरिष्ठांच्या परस्पर बदलीपात्र याद्यात घोळ घातला आहे. यासाठी लाखोंची उलाढाल झाल्याची चर्चा आहे.
मुख्य लेखापाल, लेखापाल, लिपिक, क्षेत्र सहायक, वनरक्षक, वन सर्वेक्षक व वाहनचालक आदी पदांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असून ती साधारणपणे ३० मेपर्यंत संपणार आहे. यासाठी एकाच ठिकाणी तीन वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. परंतु याच यादीत प्रत्येक कार्यालयामध्ये टेबलवर बसलेल्या बाबूंनी आर्थिक गोंधळ घातल्याचे समजते. यवतमाळ वनवृत्त कार्यालयातील वनसंरक्षक प्रादेशिक अधिकाऱ्याचे पद गत सहा महिन्यांपासून रिक्त आहे. वनवृत्ताचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्याकडे असल्याने नेमका याचाच गैरफायदा घेतला जात आहे. यवतमाळ वनवृत्त कार्यालयातील वनसंरक्षक वसंत घुले हे ऑक्टोबर २०२४ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी अद्यापपर्यंत अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे यवतमाळ वृत्ताचा कार्यभार अमरावतीचे क्षेत्र संचालक एम. आदर्श रेड्डी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नियमित 'वनसंरक्षक' नसल्याने वन विभागात सध्या कोणाचाच कोणाला पायपोस नसल्याने काही ठराविक जणांची मनमानी सुरू आहे.
यवतमाळ वनवृत्ताचा आवाका मोठा आहे. या अंतर्गत पांढरकवडा, पुसद, यवतमाळ व वाशिम डिव्हिजन येतात. बदली प्रक्रियेत काही लिपिकांच्या मनमर्जीमुळे फिल्डवरच्या पोस्टिंगचे रेट वधारले आहेत. विशेष म्हणजे या लिपिक तसेच काही अधिकाऱ्यांसाठी प्रत्येक डिव्हिजनमध्ये काही कर्मचारीच एजंटचे काम करीत असल्याचे चित्र आहे. या एजंटमार्फत टेबलवरील लोकांना हाताशी धरून सोईच्या ठिकाणी पोस्टिंग पाहिजे असल्यास लाखोंच्या घरात रक्कम देऊन पाहिजे त्या ठिकाणी बदलीची गॅरंटी दिली जात असल्याचे समजते.
काही कर्मचारी एका डिव्हिजनमध्ये १५ ते २० वर्षापासून आहेत. परंतु जे चिरीमिरी देत नाहीत. त्यांना नियम दाखवून आऊट ऑफ डिव्हिजन पाठविण्याची तयारी आहे. तर बदलीस पात्र कर्मचाऱ्यांच्या यादीतही ज्या कर्मचाऱ्यांना जास्त काळ झाला आहे, अशांची नावे यादीमध्ये न समाविष्ट करता इतर कर्मचाऱ्यांची नावे घुसडण्यात आली आहे.
कार्यालयात माहिती तरीही अप्राप्त शेरावनपाल ते वनक्षेत्रपाल पदोन्नती असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही घोळ समोर येत आहे. वनपाल ते वनक्षेत्रपाल पदासाठी यवतमाळ वृत्तांत पात्र असणाऱ्या वनपालांची माहिती पाठविण्यासाठी चिरीमिरीची वाट पाहत वेळ घातला. कर्मचाऱ्यांची माहिती डिव्हिजन स्तरावरून पूर्णपणे गेल्यानंतरही सीएफ कार्यालयामध्ये माहिती गहाळ झाल्याचे कारण देण्यात येत होते. आमच्याकडे भरपूर काम आहे, त्यामुळे वेळ लागत आहे, असे उत्तर मिळत होते. जी माहिती विभागीय कार्यालयातच आहे, त्या माहितीबद्दल अप्राप्त शेरा लिहून पुढे पाठविण्यात आली. विभागीय कार्यालयातून आलेली डाक जर वनवृत्त कार्यालयात सुरक्षित नसेल तर एकूणच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
- वनवृत्त कार्यालयातील आस्थापना शाखेतील लिपिक दोन टर्म झाले तरी त्याच ठिकाणी काम करत आहेत.
- पदोन्नती झाल्यावरसुद्धा काहींनी आस्थापना शाखेतील टेबल न सोडता त्याच टेबलवर आस्थापना शाखेत पोस्टिंग करून घेतली आहे.
- दोन टर्म झाले तरी एकच टेबल 3 सांभाळणारे अनेक जण आहेत. त्यामुळे ते डिव्हिजनमध्ये बराच काळापासून असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय देतात.