व्यवस्थापनाची अडचण : ग्राहकांच्या अडचणीत आणखी भर यवतमाळ : विधान परिषद आणि नगरपरिषद निवडणुकीतील छुप्या ‘अर्थ’कारणावर नजर ठेवण्याची जबाबदारी महसूल व पोलीस प्रशासनावर आहे. मात्र या खात्याची पथके सतत बँकांच्या रोकडवरच जोर काढत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. इकडे विधान परिषदेसाठी दोनही पक्षाकडून खुलेआमपणे ‘जेवणावळी’ उठत असताना त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिक प्रशासनावर रोष व्यक्त करताना दिसत आहे. जिल्ह्यात निवडणूक काळात करावयाची वाहन तपासणी मोहीम सर्वप्रथम दिग्रसच्या महसूल प्रशासनाने हाती घेतली. एसडीओ संदीपकुमार अपार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी दोन-तीन कारवाया केल्यानंतर अन्य उपविभागातील महसूल प्रशासन रस्त्यावर उतरले. मात्र या प्रशासनाच्या हाती लागलेली बहुतांश रोकड ही बँकांची असल्याचे निष्पन्न झाले. रोकड बँकेची आहे, हे माहीत असूनही प्रशासनाने ताठर भूमिका घेत ती ताब्यात घेतली, ट्रेझरीत ठेवली, बँकेचे वाहनही पोलीस ठाण्यात लावले. या बँकांना या पैशाचा हिशेब मागितला गेला. आधीच नियोजित तासांपेक्षा अधिक आणि रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याने बँकांची यंत्रणा मेटाकुटीस आली आहे. आपल्या इतर शाखांचे काम सुरळीत व्हावे म्हणून तेथे कॅश पोहोचविली जाते. मात्र ही कॅश मार्गातच महसूल व पोलीस पथकाकडून पकडली जात असल्याने बँकेच्या कामकाजात अडचणी निर्माण होत आहे. त्याचा परिणाम तासन्तास रांगेत उभे असलेल्या ग्राहकांवर होतो आहे. त्यांना दोन तासाऐवजी कॅशच्या प्रतीक्षेत चार तास रांगेत रहावे लागत आहे. वाहन तपासणी व बँकेची आहे, असे सांगितल्यानंतरही कॅश सोडली जात नसल्याने तपासणी पथकांवर बँकेची यंत्रणा आणि रांगेत उभे राहणारे ग्राहक रोष व्यक्त करताना दिसत आहे. या रांगेतील ग्राहक पथकांच्या कर्तव्यदक्षतेला आव्हान देत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘उलाढाल’ होत असताना या पथकांचे त्याकडे लक्ष का नाही ? राजकीय कारणांसाठी सर्रास पैसे व माणसांची ने-आण सुरू आहे, ती कोठून होत आहे, हे सर्वश्रृत आहे. असे असताना महसूल व पोलिसांच्या या संयुक्त पथकाने तेथे कारवाई करण्याची, त्यांच्या मुक्कामी स्थळांची तपासणी करण्याची हिंमत का दाखविली नाही. राजकीय नेत्यांची वाहने तपासण्याची तसदी न घेता ही पथके पुन्हा-पुन्हा बँकांच्याच वाहनांची तपासणी करून ‘कर्तव्यदक्षता’ दाखवित असल्याने बँकांच्या ग्राहकांमध्ये या पथकांप्रती तीव्र असंतोष पहायला मिळतो आहे. या पथकांनी हिंमत असेल तर राजकीय नेत्यांच्या वाहनांना हात लावावा, असे आव्हानही रांगेतून मिळत आहे.
महसूल-पोलीस पथकाचा बँकांच्या रोकडवरच जोर
By admin | Updated: November 18, 2016 02:26 IST