देशाचे प्रतिनिधित्व : पाच देशांच्या महिलायवतमाळ : जागतिकस्तरावर भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर ‘ब्रिक्स’ ची महिला संसद परिषद होत आहे. त्यामध्ये यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या शिवसेनेच्या जेष्ठ खासदार भावनाताई गवळी देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राजस्थानमधील जयपूर येथे २० आॅगस्ट रोजी या परिषदेला प्रारंभ झाला आहे. २१ पर्यंत ही परिषद चालणार आहे. २१ आॅगस्ट रोजी दुसऱ्या सत्रात सकाळी १० वाजता खासदार भावनाताई गवळी आपले विचार परिषदेत मांडणार आहेत. ‘जागतिक पातळीवर चिंतेची बाब ठरलेले हवामानातील बदल’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका (ब्रिक्स) या पाच देशातील नामवंत महिला या परिषदेत आपली मते मांडणार आहेत. त्यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खासदार भावनाताई गवळी यांची भारतीय संसदेच्या कामकाजातील तज्ज्ञसदस्य म्हणून निवड केली आहे. बीआरआयसीएसच्या पाच देशाच्या संसदेमधील ५१ तज्ज्ञ सदस्य या परिषदेत सहभागी होत आहेत. ब्रिक्स समुहाकडून विकासासह अन्य गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. १५ आणि १६ जुलै रोजी ब्रिक्सची परिषद ब्राझीलमध्ये झाली होती. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रखर भाषणातून आतंकवादाचा मुद्दा मांडला होता. आता ही परिषद जयपूरमध्ये होत आहे. जागतिक पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या परिसरातील खासदाराची निवड झाल्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
भावना गवळी जागतिक ब्रिक्स परिषदेत
By admin | Updated: August 21, 2016 01:33 IST