राळेगाव : प्रत्येक गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण स्वीकारली असल्याचे आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांनी येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. तालुक्यात यापूर्वी पाणीपुरवठ्याच्या नावावर लाखो रुपये खर्च झाले. पण त्यातून परिणाम दिसलेले नाही. उमरेड, सावित्री पिंप्री, लाडकी या गावात अजूनही भीषण पाणीटंचाई आहे. हा प्रश्न तत्काळ निकाली काढला जाईल. राळेगावकरिता एक्सप्रेस फिडर कार्यरत होवून नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ४० लाख रुपये जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करून घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. मागेल त्याला पाणी व वीज हा महत्त्वाकांक्षी संकल्प पूर्ण करण्यावर भर राहणार असल्याचे ते म्हणाले. एसटी, सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन त्यांच्या विभागाशी संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. पूल व रस्ते पूर्ण झालेल्या मार्गावर एसटी बसेस सुरू करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मार्च महिन्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले जाईल. मतदार संघातील तीनही तालुक्यात तीन रुग्णवाहिका सेवेत रुजू होईल, रुग्णांच्या मदतीसाठी कायमस्वरूपी एक मदतनिस नियुक्त केला जाईल, असे ते म्हणाले. शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी पोलिसांना दिले. यावेळी अॅड. प्रफुल्ल चव्हाण आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
प्रत्येक गावात वीज आणि पिण्याचे पाणी
By admin | Updated: February 15, 2015 02:04 IST