यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांची अनेक प्रकरणे शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहे. गेली तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे. बँका आणि पतसंस्थेच्या व्याजाचा भुर्दंड त्यांच्यावर पडत आहे. या प्रश्नांना घेवून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघातर्फे धरणे दिले जाणार आहे. २ मे रोजी हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांनी दिली. जिल्हा परिषदेतील जवळपास आठ हजार शिक्षकांना शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाचा फटका बसत आहे. नक्षलग्रस्त भागातील शिक्षकांच्या एकस्तर वेतनश्रेणीचा प्रश्न बरेच दिवसांपासून प्रलंबित आहे. नियमित १ तारखेला वेतन अदा करावे, असे निर्देश असताना त्याचे पालन केले जात नाही. चट्टोपाध्याय प्रकरणे धूळ खात पडून आहेत. भविष्य निर्वाह निधीचा अद्यावत हिशेब देवून प्रकरणे निकाली काढली जात नाही. सदर प्रश्नांसह शिक्षकांच्या आपसी बदल्या, अप्रशिक्षित आणि निमशिक्षकांना थकबाकी तत्काळ द्यावी आदी मागण्या राजुदास जाधव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि वित्त अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. ३० एप्रिलपर्यंत प्रश्न निकाली न निघाल्यास २ मे रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले जाणार आहे. त्यात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव, विनोद गोडे, विलास भोयर, गौतम कांबळे, शेख जलील, नामदेव महल्ले, शेख लुकमान, राजेंद्र पिंपळशेंडे, आसाराम चव्हाण, गणेश कदम, आनंद कुंभलवार, साहेबराव राठोड, राजू दुधे, भानुदास राऊत, रामराव टेकाळे, नंदेश चव्हाण, अनिल सरताबे, दीपक दोडके, विजय डंभारे, दादाराव देशमुख, विष्णूदास चव्हाण, शत्रुघ्न चव्हाण, प्रवीण राणे, सचिन इंगोले, अजय अक्कलवार, सुदर्शन चव्हाण, बसवेश्वर डब्बावार, सुधाकर राऊत, संजय आगुलवार, गुणवंत इंगोले, सुरेश नरवाडे, शरद इंगळे, काशीनाथ आडे आदींनी केले आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यातील आठ हजार शिक्षकांची आर्थिक कोंडी
By admin | Updated: April 27, 2015 02:00 IST