जबाबदारीची जाणीव : योगाचेही धडे, मुंबई, दिल्ली, गुजरातच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शनलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षण क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे. याविषयी शिक्षकांना माहिती व्हावी, होत असलेले बदल स्वीकारून त्यासाठी तत्पर राहता यावे यासाठी यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांसाठी शैक्षणिक कार्यशाळा घेण्यात आली. दहा दिवस चाललेल्या या कार्यशाळेची सुरुवात योगाने केली जात होती. योगा हे जीवनात परिपूर्णता, शांती, एकाग्रता आणि प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळेच योगापासून या कार्यशाळेची सुरुवात केली जात होती. यासाठी साहेबराव साखरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी चार्टर्ड अकाऊंटंट प्रकाश चोपडा यांनी मार्गदर्शन केले. आपल्याला कुठल्याही विषयाचे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर संबंधित विषय पूर्णपणे समजून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी मुंबई येथील नफिसा भिंदरवाला यांनी मार्गदर्शन केले. शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या परिवर्तनाविषयीची माहिती त्यांनी दिली. हे बदल कशा पद्धतीने स्वीकारले जावू शकते याविषयी त्यांनी सांगितले. गांधीनगर (गुजरात) येथील जगदीश व्यास यांनी आपल्या दोन दिवसीय मार्गदर्शनात शिक्षकांच्या जबाबदारीविषयी सांगितले. शिक्षणातील नवीन दृष्टिकोनाविषयीचा परिचय करून दिला. नवी दिल्ली येथील नवनीत रंजन यांनी समूहाने कार्य करत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्या कशा दूर करता येईल, याविषयी माहिती दिली. सोबतच सीबीएसईच्या मूल्यांकनावर आधारित नवीन मार्गदर्शक तत्त्वाविषयी सांगितले. कार्यशाळेच्या अंतिम दिनी प्रसिद्ध चिकित्सक आणि सल्लागार राजीव मोहता (नागपूर) यांनी किशोरावस्थेत विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्याचे समाधान कसे केले जावू शकते याविषयीचे मार्गदर्शन शिक्षकांना केले. शैक्षणिक कार्यशाळेसोबतच शिक्षकांसाठी ध्यान, एकाग्रता कार्यशाळा घेण्यात आली. हार्टफुलनेस ग्रुपतर्फे आयोजित या कार्यशाळेत हरिभाऊ कर्णेवार (यवतमाळ) यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रातील नवीन बदल स्वीकारणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता, असे प्राचार्य जेकब दास यांनी सांगितले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांनी समाधान व्यक्त केले.
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक कार्यशाळा
By admin | Updated: June 19, 2017 00:46 IST