१० कोटींचा आराखडा मंजूर : एक हजारांवर उपाययोजना यवतमाळ : जिल्ह्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या असून प्रशासनाच्या लेखी ८१४ गावांत टंचाई निर्माण होणार आहे. त्यासाठी एक हजार ७३ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. पाणी टंचाई निवारणार्थ दहा कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र या उपाययोजनांची कितपत अमलबजावणी होते यावर पाणी टंचाई निवारणाचे भविष्य अवलंबुन आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील ८१४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवणार आहे. याबाबतचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. याच्या अमलबजावणीचे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील १८६ गावामधील वाडी, वस्त्या आणि पोडावर १९० विंधन विहिरींची दुरूस्त करण्यात येणार आहे. यासोबत विहिरींचे खोलीकरण आणि दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील २३ गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरक नळयोजना सुचविण्यात आली आहे. त्यासाठी ५९ लाख रूपयांचा निधी आवश्यक आहे. १९९ गावांमध्ये नळयोजनेसाठी विशेष दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. अर्धवट असलेल्या नळयोजनांचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. या नळयोजना पूर्ण करण्यासाठी पाच कोटी १३ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ८० हजार रूपयांचा निधीची गरज आहे. २४४ गावांमध्ये सार्वजनिक विहिरींमध्ये पाण्याचा थेंबही नाही. त्या हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहे. या गावांसाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. यासाठी ५१६ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या उपाययोजनेच्या पुर्ततेसाठी दोन कोटी १२ लाख ७० हजार रुपयांचा निधी लागणार असून निधी मंजूर केला आहे.२० गावांतील विहिरींमध्ये पाण्याचा साठा भरपूर असला तरी या विहिरींमध्ये गाळ साचला आहे. हा गाळ काढल्यास तेथील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी पाच लाख पाच हजार रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील १२२ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांवर खासगी विहीर अधिग्रहण करावे अशी परिस्थिती नाही. यासाठी बाहेर गावावरून टँकर अथवा बैलगाडीच्या मदतीने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्याकरिता ९८ लाख ८५ हजार रूपयांचा निधी लागणार आहे. हा निधी मंजूर करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)
८१४ गावांवर टंचाईचे सावट
By admin | Updated: January 4, 2015 23:19 IST