फुलसावंगी शाखा : शेकडो नागरिकांचा दिवसभर बँकेत ठिय्या लोकमत न्यूज नेटवर्क फुलसावंगी : येथील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या तिजोरीच्या किल्ल्या हरविल्यामुळे दोन दिवसांपासून देवाण-घेवाणीचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे हजारो नागरिक त्रस्त आहे. फुलसावंगी जिल्हा बँकेच्या शाखेत परिसरातील २५ ते ३० गावातील नागरिकांचे खाते आहे. त्यामध्ये जवळपास १५ हजार खातेदार आहेत. या सर्व खातेदारांचा वेगवेगळ्या कारणांनी या शाखेशी संपर्क येतो. त्यामुळे रोज बँकेत मोठी गर्दी असते. शेतकरी, निराधार, अपंग, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान, पेन्शन व विविध योजनांचे लाभ जिल्हा बँकेकडूनच प्राप्त होतात. वरिष्ठ नागरिकांचे पेन्शनचे खातेही याच ठिकाणी आहे. त्यामुळे या सर्व नागरिकांचे व्यवहार खोळंबले असून त्यांना आर्थिक टंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. अनेकांचे महत्त्वाची कामे त्यामुळे अडकले आहे. उल्लेखनीय म्हणजे जिल्हा बँकेच्या फुलसावंगी शाखेतील तिजोरीच्या किल्ल्या ७ तारखेलाच हरवल्यानंतर ८ व ९ तारखेला कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यानंतर बुधवारी पुन्हा सुटी आली. या बँकेतील खातेधारक मोठ्या आशेने बाहेरगावाहून येतात. परंतु दोन्ही दिवस असंख्य खातेधारक दिवसभर उपाशीपोटी उन्हातान्हात बँकेच्या प्रांगणात बसून होते. त्यानंतर त्यांना आल्या पावली परत जावे लागले. जिल्हा बँक शाखेच्या या बेजबाबदारपणाला नागरिक त्रस्त असून संबंधितांवर व्यवस्थापनाने कठोर कारवाई करावी आणि त्वरित व्यवहार सुरळीत करून खातेधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. फुलसावंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील तिजोरीची किल्ली रोखपालाकडून हरविल्याने हजारो खातेधारकांची गैरसोय होत आहे. लग्नसराईचे दिवस असून बँक व्यवस्थापनाकडून या संदर्भात त्वरित कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. जबाबदार रोखपालावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी. - मोहमद युनूस मोहमद जाफर, फुलसावंगी
तिजोरीच्या किल्ल्या हरविल्याने जिल्हा बँकेचा व्यवहार ठप्प
By admin | Updated: May 11, 2017 01:13 IST