मार्गदर्शनाची गरज : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुसद तालुक्यात थंडबस्त्यात पुसद : शांततेकडून समृद्धीकडे गावाला घेऊन जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव समितीची महत्त्वाची भूमिका आहे. या समितीचे यश गावकरी, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयावर अवलंबून असते. मात्र सध्या त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसत असून त्यामुळे तंटामुक्त गाव योजना रखडली आहे.गावागावांत वाढत असलेले तंटे व त्यामधून होणारी ग्राम विकासाची अधोगती थांबविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. त्याचा परिणाम अनेक गावांमध्ये चांगला झाला. गावातील वाद गावातच मिटविला जात असल्याने ग्रामीण भागात विकासाच्या योजनासुद्धा परिणामकारकरीत्या राबविल्या जाऊ लागला आहेत. गावपातळीवर निर्माण झालेले किरकोळ घरगुती भांडणे कित्येकदा उग्ररूप धारण करतात. त्यातून हाणमारी होऊन कोर्टकचेरीपर्यंत प्रकरण जाते. गावातील शांतता भंग पावते. गावात निर्माण होणाऱ्या भांडणाचा ताण पोलीस, महसूल प्रशासनाला आणि न्यायालयावरही पडतो. तसेच ग्रामीण भागात व्यसनाधिनते पोटी महिलांना मानसीक व शारिरीक छळ होण्याच्या घटना घडत आहे. अशा वेळी गावागावात लहान-मोठे अनेक वादविवाद मिटविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहेत. या समित्या भांडणे मिटविणे, वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करू शकतात. वास्तविक गावपातळीवर या बाबी सामोपचाराने, विचारविनिमयाने मिटविण्याजोग्या असतात. परंतु एकमेकातील विसंवादामुळे त्याचे उग्ररूप घेऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. असे असले तरी अनेक गावात तंटामुक्त समित्यांचा बेजबाबदारपणा व निष्क्रियतेने आधीचे तंटे मिटण्याऐवजी आणखी तंट्यात वाढ झालेली दिसत आहे. शासनाने यामध्ये दखल घेऊन गावागावातील तंटामुक्त समित्यांमधील प्रतिनिधींची मानसीकता बदलवण्याची गरज आहे. तसेच निष्क्रिय पोलीस व तंटामुक्त समित्यांना समज देऊन परिणामी कलहातून उद्भवणारे तंटे मिटविण्यात त्याची भूमिका महत्वाची असते, जेणे करून गावागावांमध्ये शांतता राहिल व महात्मा गांधीच्या स्वप्नातील गाव निर्माण होईल. (तालुका प्रतिनिधी)
समन्वयाचा अभाव ठरतोय तंटामुक्तीत अडसर
By admin | Updated: December 19, 2015 02:35 IST