सुव्यवस्था राखताना दमछाक : १५ हजार लोकसंख्येमागे एक पोलीस ओंकार नरवाडे । लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : संवेदनशील आणि गुन्हेगारीत अव्वल असलेल्या महागाव पोलीस ठाण्याचा कारभार अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. १५ हजार लोकसंख्येमागे एक पोलीस येत असल्याने गुन्हेगारांवर वचक ठेवणे कठीण जात आहे. परिणामी तालुक्यात अवैध दारू, अवैध प्रवासी वाहतूक, चोऱ्या, दरोडे, मारामाऱ्या आदींच्या घटनांत वाढ झाली आहे. महागाव तालुका हा गावखेड्यात वसलेला तालुका आहे. या तालुक्याची लोकसंख्या सव्वादोन लाखांच्या आसपास आहे. याच तालुक्यातून राष्ट्रीय महामार्गही गेला आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी महागाव येथे पोलीस ठाणे आहे. परंतु या पोलीस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्यबळाचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीची मंडळी घेत आहेत. सध्या महागाव पोलीस ठाण्यात ४० कर्मचारी आहेत. त्यात एक ठाणेदार, दोन सहायक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि ३५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील चार कर्मचारी न्यायालयाच्या कामकाजात व्यवस्थ असतात. नऊ कर्मचारी साप्ताहिक सुटीवर असतात. दिवस आणि रात्र पाळीचा विचार केल्यास केवळ १५ कर्मचारी आॅन ड्युटी असतात. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढतो. तालुक्यात वारंवार घटना घडतात. फुलसावंगीतील सशस्त्र दरोडाप्रकरण यासह विविध लहान-मोठ्या प्रकरणांचा महागाव पोलीस करीत आहे. परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तपास करणे अवघड जाते. एवढेच नाही तर गुन्हेगावरीवर अंकुश ठेवतानाही मोठी कसरत करावी लागते. या सर्व बाबींचा विचार करून महागाव येथे पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर महागाव ठाण्याचा कारभार
By admin | Updated: May 14, 2017 01:21 IST