यवतमाळ : दिवाळीच्या सुट्यांमध्ये होणारी गर्दी राज्य परिवहन महामंडळाने ‘कॅश’ केली असून अवघ्या सहा दिवसात २ कोटी ८९ लाख रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्राप्त झाले. तसेच बसफेऱ्यात वाढ करून वेग मर्यादाही वाढविली आहे. सध्या दिवाळीची सुटी आहे. परिणामी एसटी बससह खासगी प्रवासी बसेसही गर्दीने चिकार भरल्या आहे. मात्र दिवाळीच्या या गर्दीचा फायदा घेत खासगी बसधारकांनी प्रवाशांची अक्षरश: लूट चालविली आहे. प्रवासदरात दुप्पट-तिप्पट वाढ केली आहे. त्यामुळे सुरक्षित आणि कमी खर्चाचे प्रवासाचे साधन म्हणून प्रवाशांनी महामंडळाला पसंती दिली. महामंडळानेही दिवाळीची गर्दी लक्षात घेवून बसफेऱ्यात वाढ केली. नेहमी २ हजार ३०० बसफेऱ्या यवतमाळ विभागातून धावतात. परंतु दिवाळीच्या काळात दोन हजार ९०० बसफेऱ्या करण्यात आला. दर दिवसाला १ लाख ८० हजार किलोमीटरचा प्रवास करण्यात आला. यातून २१ ते २७ आॅक्टोबर या कालावधीत २ कोटी ८९ लाख ५३ हजार ७४२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्पन्नात २२ टक्के वाढ झाली आहे. (शहर वार्ताहर)
एसटीने केली दिवाळीची गर्दी ‘कॅश’
By admin | Updated: October 28, 2014 23:03 IST