महागाव : तालुक्यातील लेवा ते बारभाई तांडा या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम केले. मुळात या पुलाचा आराखडाच चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आल्यामुळे पाणी पुलाखालून जाण्या ऐवजी भिंतीवर आदळून परिसरातील शेतात साचत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लेवा ते बारभाई तांडा मार्गावर पूल उभारण्यासाठी करण्यात आलेला सर्वेत प्रचंड चुका असल्याचे आता आढळून येत आहे. चुकीचा सर्वेक्षण अहवाल सादर झाला. त्यावरून ४० लाख रुपयांचे पुलाचे बांधकाम झाले. पूलच चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह पुलाच्या भिंतीवर आदळत आहे. हे पाणी परिसरातील शेतात घुसल्याने जवळपास १५ एकर शेतीचे नुकसान झाले आहे. या मार्गावर असलेल्या पोखरी, मोहदी, माळवागद, बारभाई तांडा, लेवा येथील नाल्याला बारमाही पाणी असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांच्या सोयीसाठी येथे पूल उभारण्यात आला. मात्र चुकीचा सर्वेक्षण अहवाल घेऊन काम झाल्यामुळे नवीनच समस्या निर्माण झाली आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव येथील शाखा अभियंत्याच्या चुकीने ४० लाखांचा खर्च मातीमोल ठरत आहे. या प्रकरणात परिसरातील शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे. चुकीेचे सर्वेक्षण करून निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जावी अशी मागणीही त्या परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)
बांधकाम विभागाच्या पुलामुळे शेतीचे नुकसान
By admin | Updated: November 17, 2014 23:03 IST