विडूळ येथे वादळ : अनेक घरांना तडाखा उमरखेड/विडूळ : तालुक्यातील विडूळ येथे वादळात घर कोसळून एकाच कुटुंबातील दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली असून जखमींवर उमरखेडच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. या वादळाने हाहाकार उडाला होता. अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले आहे. उमरखेड तालुक्याला शनिवारी तिसऱ्यांदा वादळाचा तडाखा बसला. रात्री ८ वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्याला प्रारंभ झाला. अवघ्या काही मिनिटात या वादळाने विडूळ येथे हाहाकार उडवून दिला. विश्वनाथ बोनसाले यांच्या घराची भिंत व लाकडी माळवद असलेले छत कोसळले. त्याखाली सोहम माणिक शेरकर (५), समृद्धी माणिक शेरकर (२) आणि सखूबाई विश्वनाथ बोनसले व प्रियंका विश्वनाथ बोनसले दबल्या गेले. त्यांना तातडीने बाहेर काढून उमरखेडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या वादळात अनेकांच्या घरावरील छप्पर उडाली असून विजेचे खांबही वाकले आहे. जिल्हा परिषद शाळेचे छप्पर पूर्णत: उडून गेले असून कन्या विद्यालयाचे छप्परही उडाले, अनेकांचे मोठे नुकसान झाले. रविवारी तलाठी एम.बी. घट्टे व तलाठी मस्के यांनी पंचनामा केला. (शहर प्रतिनिधी)
घर कोसळल्याने एकाच कुटुंबातील चौघे गंभीर
By admin | Updated: March 14, 2016 02:34 IST