राळेगाव : शेतकऱ्यांचे विशेषत: अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना उपजीविकेची साधने उपलब्ध करून देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी गतवर्षीपासून कोरडवाहू शेती अभियान सुरू करण्यात आले. या अंतर्गत पहिल्या व एकमेव गावातील निवड झालेल्या आठमुर्डी येथे अभियानात अपयश आल्याने या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. कृषी उत्पादनात शाश्वत वाढ करण्याच्या हेतूने हे अभियान राबविले जाणार होते. एक हजार ३४३ लोकसंख्या, ३२३ कुटुंब संख्या, १६५ शेतकरी कुटुंब असलेल्या आठमुर्डीत हा प्रयोग गतवर्षीपासून सुरू करण्यात आला होता. २७७ हेक्टर क्षेत्र जिरायती होते. या गावात विहिरीवरून केवळ ७७ हेक्टर तेवढे सिंचन होत होते.या गावात ही मोहीम राबविण्यासाठी प्रथम कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले. शेतकरी गट प्रमुखांनाही प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी गटसंघटन तयार करण्यात आले. शेतकरी, शेतीशाळा घेण्यात आल्या. शेतकरी अभ्यास दौरा झाला. ४० लाख ५९ हजार रुपयांचे सहा साखळी बंधारे या गावात बांधण्यात आले. १७ शेततळ्यांच्या खोदकामावर एक लाख ४० हजार रुपये खर्च करण्यात आले. उपसा सिंचन अंतर्गत २५ इलेक्ट्रीक आणि ३२ डिझेल इंजीन यावर पाच लाख सात हजार रुपये खर्च करण्यात आला. त्यामुळे आठमुर्डी परिसरात जलसंग्रहण क्षमता वाढली. पाण्याची पातळी वाढली आणि सिंचनाची सुविधा निर्माण झाली. पण, पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्याने पुढील कामांवर आता प्रश्न चिन्ह लागले आहे. शासनाद्वारे शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. पण त्यास शेतकऱ्यांकडून वारंवार नकार दिला जात असल्याची माहिती असून अनुदानाच्या प्रमाणात आणखी वाढ करण्यात यावी, अशी त्यांची अपेक्षा असल्याने हे अभियान फसले आहे. पॅक हाऊससाठी दोन लाख अनुदान आणि दोन लाखांचा लोकवाटा आहे. हरितगृहासाठी दोन लाख अनुदान, दोन लाख लोकवाटा, पॅक हाऊसकरिता ७.५ लाख अनुदान आणि तेवढाच लोकवाटा दालमिलकरिता ७० हजार रुपये यात अर्धे अनुदान आणि अर्धा लोकवाटा आहे. मात्र यासाठी शेतकऱ्यांचा नकार असल्याचे सांगितले जाते. योजना राबविताना संबंधित प्रशासनाकडूनही फारसे प्रयत्न झाले नसल्याचेही दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)
कोरडवाहू शेती अभियान फसले
By admin | Updated: December 29, 2014 02:16 IST