शेवटचा दिवस : तुरीच्या ट्रान्सपोर्टसाठी वाहनांच्या रांगा, पोलिसांचीही मदत घेणार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : तूर खरेदीसाठी केवळ एक दिवस उरला आहे. या एका दिवसाात तब्बल पावणे दोन लाख क्विंटल तुरीचे मोजपाप करण्याचे आव्हान खरेदी केंद्रांपुढे उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर आत्तापर्यंत नव्याने तीन लाख क्विंटल तूर खरेदी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या केंद्रांवर आणखी पावणे दोन लाख क्विंटल तूर खरेदी करायची आहे. सध्या या केंद्रांवर ६० हजार ३५० क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. याशिवाय आठ हजार १९२ टोकनधारक शेतकऱ्यांच्या घरी एक लाख १२ हजार ३४७ क्विंटल तूर पडून आहे. त्यांना अद्याप खरेदी केंद्राकडून बोलावणेच आले नाही. ३१ मे ही तूर खरेदीची अंतिम तारीख आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंंद्रांवर एकच गर्दी केली आहे. ही स्थिती हाताळण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना सहकार विभागाने केंद्रांना दिल्या आहेत. शासकीय तूर खरेदी केंद्रावर आलेली तूर वेअर हाऊसमध्ये घेऊन जाणे बंधनकारक आहे. त्यानंतरच चुकारे मिळणार आहे. मात्र वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. गोदामात जागा नसल्याने वाहन रिकामे करण्यासाठी गोदामासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच तूर खरेदी वादात सापडली आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. परंतु शासनाकडून नियोजनपूर्वक खरेदी करण्यात न आल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याचा फायदा व्यापाऱ्यांनी करून घेतला आहे. आता पुन्हा एकदा तूर खरेदीसाठी केवळ एक दिवस उरला असल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. एका दिवसात तूर खरेदी करण्याचे आव्हान यंत्रणेला पेलवणे कठीण वाटत आहे.
एक दिवसात पावणे दोन लाख क्विंटलचे आव्हान
By admin | Updated: May 31, 2017 00:25 IST