बच्चू कडू : स्वामिनाथन आयोगासाठी पंतप्रधान निवासावर मोर्चा काढणार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जखमांवर तातडीची मलमपट्टी झाली. मात्र, माफीमुळे कर्जमुक्ती होणार नाही. त्यासाठी सर्जरी करावी लागणार आहे. म्हणूनच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, या मागणीसाठी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासावर प्रहारतर्फे मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. बाभूळगाव तालुक्यातील भोई समाजबांधवांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी शनिवारी आमदार कडू आले होते. बाभूळगावातील सभेनंतर यवतमाळातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, शेतकरी आंदोलन हे सामान्य शेतकऱ्यांचेच आंदोलन होते. कर्जमाफीचे श्रेय त्या आंदोलक शेतकऱ्यांचेच आहे. ५ जूनचा बंद ही देशातील ऐतिहासिक घटना होय. मात्र, निकषांमुळे या कर्जमाफीचा लाभ अर्ध्याच शेतकऱ्यांना होणार आहे. आता स्वामिनाथन आयोग लागू करण्यासोबतच आयात-निर्यातीच्या धोरणावरही लक्ष द्यावे लागणार आहे. सरकार आधी ३१ आॅक्टोबरपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्याची भाषा करत होते. मात्र, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि सुकाणू समितीच्या चर्चेमुळे आत्ताच कर्जमाफी घोषित झाली व नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या तातडीने १० हजारांचे कर्ज मिळणे आवश्यक आहे. घोषणेनंतर २-३ दिवस उलटूनही ते मिळताना दिसत नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असलेल्या शेतकऱ्यांवर घातलेली बंधनेही काढण्याबाबत चर्चा करणार असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. पॉलीहाउस, ठिबक सिंचनासाठी कर्ज घेणारे शेतकरी, उसणवारी करून बँकेचे कर्ज फेडणारे शेतकरी यांनाही कर्जमाफीचा फायदा मिळावा, यासाठी २०-२१ जूनच्या बैठकीत प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. वाघासाठी अमिताभ, मग शेतकऱ्यांसाठी कोण ? यवतमाळ जिल्ह्यात अनेकांची शेती जंगलाकाठी असल्याने वन्यप्राण्यांचा त्रास आहे. वन्यप्राण्यांना मारले, तर शेतकऱ्यांवर कारवाई होते. शेतकऱ्याचा बैल वनजमिनीत घुसला, तर वापसच येत नाही. वाघ वाचवण्यासाठी सरकारने आमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अॅम्बेसिडर केले. पण वाघाच्या हल्ल्यात मरणाऱ्या शेतकऱ्यांना कोण वाचवणार? आत्तापर्यंत २१ नेते शेतकऱ्यांविषयी अपशब्द बोलले. शेतकरी वेगवेगळ्या पक्षाच्या दावणीला बांधला गेल्याने त्यांचे प्रश्न सुटत नाही. हाती नांगर धरला की शेतकऱ्याने डोक्यात धर्म-जात ठेवूच नये. आपल्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले.
मलमपट्टी झाली, आता सर्जरी करा !
By admin | Updated: June 18, 2017 00:56 IST