यवतमाळ : महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्या रोज एसटी बसने जाणे-येणे करतात... ग्रामीण भागातील या मुलींना यवतमाळपर्यंत सुरक्षित नेण्याची जबाबदारी एसटीचे चालक वाहक पार पाडत असतात. अशी सुरक्षितता पुरविणाऱ्या चालक वाहकांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रवासी विद्यार्थिनींनी राख्या बांधून अनोखे नाते जोडले.यवतमाळ बसस्थानकावर शनिवारी सकाळी हा प्रसंग पाहणाऱ्यांना सुखद अनुभव आला. अमोलकचंद महाविद्यालयात शिकण्यासाठी बाहेरगावातून येणाऱ्या विद्यार्थिनी सकाळीच बसस्थानकावर दाखल झाल्या. हाती आरतीचे ताट होते. रोज आपल्याला सुरक्षित प्रवास घडविणाऱ्या चालक-वाहक दादांची त्यांनी ओवाळणी केली. त्यांना राख्या बांधल्या. सणाच्या दिवशीही कर्तव्य बजावत असलेले चालक-वाहक या बहिणींच्या ओवाळणीने हरखून गेले. बसस्थानकावरच्या गर्दीतही दिसलेला हा बंधुभाव बघून इतर प्रवासीही सुखावून गेले. शिक्षणासाठी जाणे-येणे करताना विद्यार्थिनी व परिवहनच्या कर्मचाऱ्यांचे अनोखे भावबंध जुळले. (स्थानिक प्रतिनिधी)
घडला प्रवास नात्याचा..!
By admin | Updated: August 30, 2015 02:18 IST