पोलिसांचे अपयश : श्रीकृष्णनगर, पिंपळगावातील घटना, दहशत कायम यवतमाळ : शहराच्या दारव्हा मार्गावरील श्रीकृष्णनगरात दिवसा ढवळ््या व पिंपळगाव परिसरात मध्यरात्री घराचे दार तोडून चोरट्यांनी शस्त्राच्या धाकावर रोख रक्कम नेली. या दोन्ही घटना तांत्रिकदृष्ट्या दरोडा ठरत नाही. मात्र आरोपींची कृती सर्वांनाच धडकी भरविणारी होती. दुर्दैवाने या दोन्ही घटनेतील आरोपींचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही. यामुळे शोध पथकांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाले आहे. वडगावरोड पोलीस ठाण्यांतर्गत श्रीकृष्णनगरातील सतीश फाटक यांच्या घरी दुपारी १२ वाजता आरोपींनी घुसून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर रोख रक्कम नेली, इतकेच नव्हेतर घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआरसुध्दा कापून नेला. अगदी वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या घरात आरोपी थेट शिरले. केवळ त्यांची संख्या ही पाचपेक्षा कमी होती. अगदी तशीच घटना पिंपळगाव परिसरातील संजय गावंडे या शिक्षकाच्या घरी झाली. मध्यरात्री घरी झोपून असताना तीन आरोपींनी दार तोडून घरात प्रवेश केला. त्या शिक्षकाचे हातपाय बांधून चाकूच्या धाकावर रोख रकमेसह घरातील इतर साहित्य घेऊन गेले. या दोन्ही घटनेने सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. श्रीकृष्णनगरातील घटना होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला. त्यानंतरही गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले नाही. विशेष म्हणजे यातील दोन आरोपींचे स्केचही फाकट यांच्या पत्नीने सांगितलेल्या वर्णनावरून तयार केले होते. त्याच पध्दतीची घटना आठ दिवसांपूर्वी पिंपळगाव येथे घडली. त्यातील गुन्हेगारही अजून पोलिसांच्या टप्प्यात आले नाही. एकीकडे गुन्हेगारांकडून आव्हानात्मक चोऱ्या केल्या जात आहे तर, दुसरीकडे पोलिसांच्या प्रमुख तपास यंत्रणा किरकोळ मटका व जूगार अड्ड्यावर धाडी टाकण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसून येते. धाडसी चोरीच्या घटनामुळे चोरट्यांचेही मनोबल उंचावले आहेत. तपास यंत्रणांचे नेटवर्क कोलमडल्याने गुन्हे उघडकीस येताना दिसत नाही. विशेषत: या दोन घटना पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरल्या आहेत. यापूर्वीचेही दरोड्याचे गुन्हे कित्येक वर्षांपासून अजूनही तपासातच आहे. त्यातील आरोपींचा मागमुसही पोलिसांना लागला नाही. गुन्हेशोध पथकाने उघडकीस आणलेल्या घटनाचासुध्दा पूर्ण तपास झालेला नाही. अनेक महत्वपूर्ण प्रकरणांचा तपास रखडल्याचे दिसून येते. याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी) आर्णी, फुलसावंगीतील तपास खुंटला फुलसावंगी घटनेतील म्होरक्या अजूनही पसार आहे. बनावट डेबीट कार्ड तयार करून खरेदी करणाऱ्या प्रकरणातील बंगलोरची कडी अजूनही उलगडण्यात आली नाही. आर्णीत पडकण्यात आलेल्या लाखोंच्या गुटखा प्रकरणात तो आला कोठून, तयार कुठे होतो याचा शोध घेतलाच नाही. पाच आरोपींच्या पुढे हा तपास सरकलाच नाही. यातून संपूर्ण राज्यातील गुटखा विक्रीचे रॅकटे हाती लागले असते. मात्र दोन दिवसांत कारवाई गुंडाळण्यात आली.
सशस्त्र दरोडेखोरांचा सुगावाच नाही
By admin | Updated: March 6, 2016 03:07 IST