पुसद : दोन महिन्यांपूर्वी शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्तात येथील कब्रस्तान कमिटीने उत्तम सहकार्य केले. या कार्याची जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दखल घेतली. रमजान ईद दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून कब्रस्तान कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनाला सहकार्य केले. प्रशासनाच्या व आयोजन समितीच्या दक्षतेमुळे शहरात एक आदर्श निर्माण झाला. सुरक्षेची जबाबदारी केवळ पोलीस प्रशासनाची नसून सर्वसामान्य जनतेचीही आहे. याचा प्रत्यय ईदच्या उत्साहात शहरवासीयांना आला. कब्रस्तान कमिटीच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या शांतता समितीच्या सभेमध्ये जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या हस्ते इदगाह कमिटीचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी कब्रस्तान कमिटीचे गुड्डूभाई, जबार लाखे, मिर्झा अयद बेग व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुसदच्या कब्रस्तान कमिटीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल
By admin | Updated: September 4, 2016 00:56 IST