पहिलीच सुनावणी : संचालकांनी वेळ वाढवून मागितलायवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांसाठी १४ लाख रुपयांची इनोवा गाडी खरेदी केल्या प्रकरणाची चौकशी सोमवारपासून सुरू झाली. चौकशीच्या पहिल्याच दिवशी सर्व संचालकांनी आपली बाजू मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितला. आता २ मार्च रोजी या प्रकरणात पुढील सुनावणी होणार आहे.शेतकरी दुष्काळात असताना शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्तीमध्ये संचालकांकडून होणारी उधळपट्टी नवीन नाही. याच उधळपट्टीतून अध्यक्षांसाठी इनोवा खरेदी करण्यात आली होती. त्यावर शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी विधीमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून या वाहन खरेदीची चौकशी अमरावतीच्या विभागीय सहनिबंधक सुषमा डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आली. डोंगरे यांनी या चौकशीसाठी विभागीय उपनिबंधक समाधान सोनवणे यांना नियुक्त केले. कलम ८३ अंतर्गत २ फेब्रुवारी सोमवार रोजी येथील उपनिबंधक कार्यालयात संचालकांना पाचारण करण्यात आले होते. मात्र बहुतांश संचालकांनी वकीलामार्फत बाजू मांडण्यासाठी वेळ मागवून घेतला. २ मार्च ही पुढील तारीख निश्चित करण्यात आली. विशेष असे, ज्या संजय राठोड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता, ते सध्या महसूल राज्यमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे बँकेचे कुणीही दोषी आढळल्यास कारवाई निश्चित मानली जात आहे. दरम्यान, संचालकांना बाजू मांडण्यासाठी नियमानुसार वेळ वाढवून दिल्याचे उपनिबंधक तथा चौकशी अधिकारी समाधान सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. २ मार्चनंतर लगेच या चौकशीचा अहवाल सहकार आयुक्तांना सादर केला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हा बँक अध्यक्षांच्या वाहन खरेदीची चौकशी
By admin | Updated: February 2, 2015 23:12 IST