संचालकांचा कारनामा : ना ठराव, ना मंजुरी यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही संचालकांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याण निधीतील तब्बल ६० लाख रुपयांच्या रकमेचे नियमबाह्यरीत्या विल्हेवाट लावल्याची माहिती आहे. हा निधी खर्च करताना ना ठराव घेतला गेला, ना मंजुरी मिळविली गेली. ६० लाखांची विल्हेवाट लागल्याचे उघड झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संचालकांप्रती रोष पहायला मिळतो आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कल्याण निधी म्हणून दरमहा १५ रुपये कपात केली जाते. एवढीच रक्कम बँक स्वत: टाकते. गेल्या आठ-दहा वर्षांपासून या निधीची कपात सुरू आहे. कल्याण निधीची ही रक्कम ६० लाखांच्या घरात पोहोचली होती. मात्र कर्मचाऱ्यांना अंधारात ठेऊन हा निधीही एका बांधकामावर खर्च दाखविण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेचा हनुमाननगर भागात भूखंड आहे. या भूखंडावर सांस्कृतिक केंद्र बांधण्यात आले. त्यावर हा संपूर्ण ६० लाखांचा निधी खर्ची दाखविण्यात आला. या केंद्राला मंगल कार्यालयाचे स्वरूप दिले जाते. सहा ते सात महिन्यांपूर्वी बांधकामाच्या नावाखाली या निधीची विल्हेवाट लावली गेली. आजच्या घडीला कर्मचारी कल्याण निधीच्या खात्यात झिरो बॅलन्स असल्याचे सांगण्यात येते. हा निधी खर्च करण्यासाठी कोणताही ठराव घेतला गेला नाही किंवा कर्मचाऱ्यांची बहुमताने मंजुरी घेतली गेली नसल्याचे बोलले जाते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कल्याण निधीच्या खात्यातील झिरो बॅलन्सची कल्पना मिळू नये यासाठी संचालकांकडून गुप्तताही पाळली गेली. मात्र ही बाब उघड झालीच. त्यामुळे बँकेचे कर्मचारी आक्रमक झाले आहे. या प्रकरणाची ते रितसर तक्रार करुन संचालकांना जाब विचारणार आहे. सांस्कृतिक केंद्र बांधकामासाठी नेमके ६० लाख लागले कसे याचा हिशेब विचारला जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) निवडणुकीसाठी ‘जेटी’कडे याचिका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नऊ वर्षांपासून एकच संचालक मंडळ आहे. या संचालकांचा प्रचंड आर्थिक धुडगुस सुरू आहे. या बँकेची संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी, यासाठी अॅड. सुरेश भुसे यांनी अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल केली. गैरकारभाराचे पुरावे म्हणून ‘लोकमत’ची वृत्तमालिका तक्रारीसोबत सादर करण्यात आली. त्यावर ६ आॅक्टोबर रोजी सुनावणीही पार पडली.
जिल्हा बँक कर्मचाऱ्यांच्या ६० लाखांची विल्हेवाट
By admin | Updated: October 9, 2016 00:05 IST