विद्यार्थी संतप्त : वसतिगृहांमध्ये विविध सुविधांचा अभाव पुसद : शासकीय वसतिगृहांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी पुसद येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात जाऊन संताप व्यक्त केला. तसेच येथील साहित्याची तोडफोड केली. यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पुसद आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत पुसद आणि उमरखेड येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज विद्यार्थी पुसद येथील प्रकल्प कार्यालयावर पोहोचले. मात्र त्याठिकाणी प्रकल्प अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. कार्यालयातील फाईलींची फेकाफेक करून खिडक्यांची तावदानेही तोडण्यात आली. हा प्रकार माहीत होताच पुसद शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. दरम्यान विद्यार्थ्यांनी या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत प्रकल्प अधिकारी येत नाही तोपर्यंत याच ठिकाणी ठिय्या देण्याचा निर्धार केला. दरम्यान तहसीलदार आणि ठाणेदारांनी विद्यार्थ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम होते. या प्रकारामुळे प्रकल्प कार्यालय परिसरात वातावरण चांगलेच तापले होते. (प्रतिनिधी)
आदिवासी प्रकल्प कार्यालयात तोडफोड
By admin | Updated: October 7, 2015 02:49 IST