भाव गडगडले : मळणी यंत्रातून काढणी महागलीपुसद : परतीच्या पावसातून बचावलेल्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आली असून, बाजारातील भाव पाहून सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच पडत आहे. गडगडलेले भाव आणि मळणी यंत्राचे वाढलेले दर यामुळे शेतकरी पुरता निराश झाला आहे. पुसद तालुक्यात गत काही वर्षांपासून शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनकडे वळला आहे. कपाशीचा लागवड खर्च आणि उत्पन्न कमी यामुळे तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढले. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली. सुरूवातीला दमदार पावसाने सोयाबीन चांगले बहरले. मात्र सोयाबीन ऐन फुलोऱ्यावर असताना पावसाने महिनाभर दडी मारली. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन सोयाबीन जगविले. यंदा मुबलक पीक होईल अशी आशा होती. त्याचवेळी परतीच्या पावसाने दगा दिला. अनेकांच्या शेतातील सोयाबीनला कोेंब फुटले, अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घरी सोयाबीन येऊ लागला. मात्र सोयाबीनला बाजारभाव कमी मिळू लागला. गत वर्षी चार हजार रुपये प्रती क्विंटल असलेला सोयाबीनचा भाव यंदा अडीच हजार रुपयावर आला. त्याच सोयाबीन काढणीसाठी लागणाऱ्या मळणी यंत्राचे भाव वाढले आहे. मजुरांची मजुरी लाव-लागवड खर्च आदींचा हिशेब लावल्यास शेतकऱ्याच्या हाती काहीही उरत नाही. दुसरीकडे कपाशीवर आशा असताना आता लाल्याचे आक्रमण झाले आहे. मुबलक पाणी होऊनही यंदाही शेतकऱ्यांच्या नशिबी दुष्काळाचेच सावट आहे. दरवर्षी चांगली सुगी होईल अशा आशेत असलेल्या शेतकऱ्यांची पुसद तालुक्यात घोर निराशा झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा
By admin | Updated: November 6, 2016 00:26 IST