शिवसेना रस्त्यावर : यवतमाळात गाढवाला चपलाचा हार घालून धिंड लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालना येथे शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्याने शेतकऱ्यात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करून दानवे यांच्या पुतळ्याचे दहन केले. यवतमाळात गाढवाला चपलांचा हार घालून धिंड काढण्यात आली. शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसंदर्भात बुधवारी जालना येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपत्तीजनक वक्तव्य केले. या वक्तव्याचा ठिकठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेनेने यवतमाळात दत्त चौकात आंदोलन करून निषेध केला. गाढवाला चप्पल घालून धिंड काढली. तर माध्यमांशी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुखांनी दानवेंची जीभ हासडणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. आंदोलनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, राजेंद्र गायकवाड, गजानन डोमाळे, तालुका प्रमुख किशोर इंगळे, शहर प्रमुख पराग पिंगळे, संजय रंगे, अरुण वाकले, गजानन पाटील, अतुल गुल्हाने, राजू नागरगोजे, दीपक पेंटर, अनिल यादव, नीलेश बेलोरकर, गिरीष व्यास, पिंटू बांगर, उद्धव साबळे, अतुल बोराडे, राजू राऊत, राजू शेख, संजय उपगनलावार, राजू टेंभरे, पुरुषोत्तम टिचूकले, गोलू दोंदे, राजू कोहरे, संतोष गदई, अतुल कुमटकर, विजय माळवी, हेमंत उगले आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उमरखेड येथील संजय गांधी चौकात दुपारी १२.३० वाजता शिवसैनिकांनी निषेध करून काही काळ रस्ता रोको केला. पुसदमध्ये छत्रपती शिवाजी चौकात दानवे यांच्या पुतळ्याचे शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दहन करण्यात आले. महागाव येथे नवीन बसस्थानक परिसरात पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. वणी येथील टिळक चौकात सकाळी ११ वाजता रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून निषेध करण्यात आला. मारेगाव येथेही दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. जिल्ह्यात विविध ठिकाणी दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
दानवेंच्या वक्तव्याचा निषेध
By admin | Updated: May 12, 2017 00:17 IST