आमदारांना निवेदन : शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाटआर्णी : राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती जाहीर करताना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यावर अन्याय केला. आर्णी तालुक्यातील पीक परिस्थिती बिकट असल्याने या तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी आमदार ख्वाज बेग यांच्यासह प्रभारी तहसीलदार सुधीर पवार यांना दिले.शेतीची परिस्थिती यंदा अत्यंत वाईट असतानाही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक दाखविणे ही गंभीर बाब आहे.तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचा उतारा दोन-तीन क्विंटलच्या वर नाही. उत्पादन खर्चही भरून निघू शकत नाही. कपाशीची स्थितीही अशीच आहे. झाड हिरवे आहे, उंच आहे म्हणजे उत्पादन वाढेल असा समज करून पैसेवारी ५० पैशाहून अधिक दाखविणे ही मनमानी आहे. दुष्काळग्रस्त गावांच्या प्रसिद्ध झालेल्या यादीत आर्णी तालुका वगळल्याने शेतकरी निराश झाले आहे. जिल्ह्यातील पिंप्री बुटी येथे आले असता मुख्यमंत्र्यांनी पीक परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त यादीतून संपूर्ण जिल्हा वगळल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट आहे. त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा असा भाव द्यावा, सातबारा कोरा करून कर्जमाफी करावी, वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाच्या वीजजोडण्या मिळाव्या आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी रवींद्र नालमवार, हरीष कुडे, सुनील राठोड, चिराग शाह, फिरोज बेग मिर्झा, रवी राठोड, मनोज माघाडे, सुहेल पटेल, लक्ष्मण राठोड, परमेश्वर कांबळे, हारुन शाह, परवेज बेग मिर्झा एजास सैयद, यासीन नागनी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
आर्णी तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी
By admin | Updated: October 21, 2015 02:42 IST