यवतमाळ : अपुरा पाऊस आणि सोयाबीनचा उतारा कमी आल्याने सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. त्यातच महागाईनेही कहर केला आहे. मात्र या सर्व गोष्टींना बाजूला सारुन वर्षातील सर्वात मोठ्या दिवाळी सणासाठी जोरात खरेदी सुरू आहे. यवतमाळात रविवारी खरेदीच्या गर्दीने उच्चांक मोडला असून कोणत्याही रस्त्यावर पाय ठेवायला जागा नव्हती. दिवाळीपूर्वीचा शेवटचा आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्याच सोबत शासकीय सुटी असल्याने कर्मचारीही बाजारात खरेदी करीत होते. यवतमाळात सकाळी ९ वाजतापासून प्रचंड गर्दी दिसत होती. इंंदिरा गांधी मार्केटमध्ये कपडे आणि इतर वस्तूंची खरेदी सुरू होती. लहान मुलांसोबत आलेले पालक या भागात सकाळपासून दुकाने पालथी घालत होती. नेताजी मार्केट परिसरात ग्रामीण भागातून आलेल्या कष्टकऱ्यांनी मोठी खरेदी केली. तर मेन लाईनमध्ये विविध वस्तू आणि दिवाळी सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी सुरू होती. दत्त चौक परिसरात प्रसाद आणि लक्ष्मी मूर्ती, पणत्या खरेदी करताना महिलांची संख्या लक्षणीय होती. यवतमाळच्या आझाद मैदानावर लागलेल्या फटाका बाजारात खरेदीसाठी बच्चे कंपनींसोबत मोठी माणसेही दिसत होती. आर्णी मार्ग परिसरातील दुकानांमध्येही नागरिकांची गर्दी झाली होती. आठवडी बाजार तर खास दिवाळीच्या वस्तूंनी सजला होता. उटणे, अगरबत्ती, सुहासिक साबू या वस्तू नागरिक खरेदी करीत होते. यासोबत ग्रामीण भागातून आलेल्या महिला तोरड्या, बांगड्या, नेलपॉलिश यासह लहान मुलांचे कपडे खरेदी करताना दिसत होत्या. बाजारात विक्रेत्यांंना बोलायलाही वेळ नव्हता. (शहर वार्ताहर)बाजारात चैतन्य४दुष्काळी परिस्थितीमुळे गत आठवड्यापर्यंत बाजारात चैतन्य नव्हते. दुकानदार ग्राहकांची प्रतीक्षा करीत होते. मात्र दिवाळीला प्रारंभ होताच बाजारात चैतन्य निर्माण झाले. सर्व दुकाने गर्दीने फुलून गेली आहे.
दिवाळीची खरेदी जोरात
By admin | Updated: November 9, 2015 05:19 IST