आर्थिक अडचण : १५ हजार हेक्टर क्षेत्रावरील उत्पन्नावर परिणामदारव्हा : सोयाबीन पिकात दाणे भरण्याच्या अवस्थेत पावसाचा ताण व वाढलेले तापमान यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट झाली आहे. सध्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी केली त्यांना एकरी दोन ते पाच पोत्यांवर समाधान मानावे लागत आहे. ओलित केलेल्या अपवादात्मक शेतकऱ्यांचे क्षेत्र वगळता जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.यंदा मृग नक्षत्रातच मान्सूनचा पाऊस प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. सुरुवातीच्या काळात पावसाने खंड दिला. परंतु जमिनीत असलेल्या ओलाव्याने सोयाबीनचे पीक चांगल्या प्रकारे उगवले तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षी पाऊस उशिरा येत असल्याने जुलै महिन्यात जांभूळवाही केल्यानंतर पेरणी आटोपली. मागील वर्षी सोयाबीनच्या उताऱ्यात घट झाल्याने यावर्षी तालुक्यातील सोयाबीनचे क्षेत्र घटले असले तरी यंदा जवळपास १५ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होता. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक काढणीस तयार झाल्याने गत आठवडाभरापासून शेतकऱ्यांची कापणीची लगबग सुरू झाली आहे. कापणीनंतर ट्रॅक्टरद्वारे चालणाऱ्या मळणीयंत्राच्या सहाय्याने पीक काढणी केल्या जात आहे. सोयाबीन काढणीनंतर आर्थिक अडचण भागविण्याकरिता शेतकरीवर्ग आपले सोयाबीन बाजारात विक्रीकरिता आणत आहेत.यावर्षी एकरी दोन ते पाच पोते सरासरी सोयाबीनचा उतारा येत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित ओलिताची सोय व साधने आहेत अशांनी मध्यंतरीच्या काळात ओलित केल्याने अशा अपवादात्मक शेतकऱ्यांना एकरी सात पोते उतारा मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना जमिनीचा स्तर पाहता ओलितानंतरही फारसा उत्पन्नात फरक पडला नाही. हलकी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक तर परिपक्वतेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच सोयाबीन पीक वाळल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीन दाण्याचा आकार बारीक झाल्याने परिणामी उत्पन्नात घट झाली आहे. सोयाबीन पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडला की उत्पन्नात हमखास घट येते. शेंगामधील दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण व ग्लोबल वॉर्मिंगमुळे आॅक्टोबर हिट यंदा सप्टेंबर महिन्यात जाणवली. अचानक तापमानात वाढ झाली. त्यात रसशोषक किडींनी पानांमधील हरितद्रव्य कमी केल्याने परिपक्वता कालावधी पूर्ण होण्याआधीच सोयाबीन काढणीस आल्याने तालुक्यात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मिळेल त्या भावात शेतकरीवर्ग आपले सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. (प्रतिनिधी)
दारव्हा तालुक्यात सोयाबीन उताऱ्यात घट
By admin | Updated: October 10, 2015 02:00 IST