जेवण व वाहन खर्चाची तयारी : जिंकण्यासाठी सगळेच फंडे वापरू लागले उमेदवारमारेगाव : येथे मतदार कमी असल्यामुळे सर्वच प्रभागांत एका-एका मताला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे विजयासाठी उमेदवार सर्व तऱ्हेचे प्रयत्न करू लागले आहे. मताचे गणित जुळविण्यासाठी इतरत्र गेलेल्या मतदारांना मतदानाला येण्याचे निरोप पाठविले जात असून त्यांच्या प्रवास व जेवणाच्या खर्चाची व्यवस्थाही करण्याची हमी दिली जात आहे.येथील नगरपंचायतीचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रत्येक उमेदवार जिंकण्याच्याच मनसुब्याने रिंगणात उतरला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आपण कसे विजयी होणार आहोत, याचे सर्वच उमेदवार गणित मांडत आहे. नगरपंचायतीसाठी १७ उमेदवार निवडायचे असले, तरी प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करीत आहे. शहराच्या प्रभाग रचनेत अनेक प्रभागातील मतदार संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कमी मतदारांत जास्त उमेदवार उभे असल्याने कमी मतात उमेदवार विजयी होणार आहे. कमी मतांचे गणित लक्षात घेता एका-एका मताला आता सोन्याचा भाव आला आहे. एक-एक मत मिळविण्यासाठी उमेदवार जिवाचे रान करीत आहे. कामधंदा, नोकरी आदी निमित्ताने व बदली करून गेलेल्या स्थलांतरित मतदारांच्या मतदानावर बहुतांश उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एवढेच नाही, तर जो बाहेर स्थलांतरीत मतदार आणण्यास यशस्वी होईल, तो निश्चितच विजयी होईल, असे चित्र असल्याने स्थलांतरित मतांनाही प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. नगरपंचायत निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेता, जिल्हा व राज्य पातळीवरचे दिग्गज राजकारणी येथे प्रचारासाठी आणले जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतीची निवडणूक जास्त प्रतिष्ठेची असते, हे येथील सर्वसामान्य मतदारांच्या आता लक्षात येऊ लागले आहे. आरोप-प्रेत्यारोपाच्या फैरी जोरदारपणे झडत आहे. १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदानाला शहरातून बदलून गेलेले कर्मचारी, तसेच नोकरीनिमित्त व विवाहामुळे बाहेरगावी गेलेले तरूण-तरूणी, शिक्षणासाठी बाहेरगावी असलेले विद्यार्थी, अशा स्थलांतरित मतांचे महत्त्व विजयी होण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. याची कल्पना उमेदवार व पॅनल प्रमुखांना आली आहे. ज्या पॅनल प्रमुखांना शहर व निवडणुकीचा गाढा अभ्यास आहे, त्यांनी आता बाहेरगावी असलेला मतदार गोळा करण्याची यंत्रणा कामी लावण्यास सुरूवात केली आहे. बाहेरगावी असलेल्या मतदारांशी फोनवरून संपर्क साधला जात आहे. (शहर प्रतिनिधी)
स्थलांतरित मतदार ठरणार निर्णायक
By admin | Updated: October 29, 2015 02:59 IST