शिवणीची घटना : अॅम्बुलन्सही उलटलीरुंझा : रस्त्याच्या कडेला शौचास बसलेल्या एका तरुणीला अॅम्बुलन्सने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ती जागीच ठार झाली. तर अपघातानंतर अॅम्बुलन्सही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. ही घटना घाटंजी तालुक्यातील शिवणी येथे सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. वैशाली ठाकूर राठोड (१७) रा. शिवणी असे मृत तरुणीचे नाव आहे. ती रात्री शौचास गेली होती. त्याच वेळी आरोग्य केंद्राकडे येणाऱ्या अॅम्बुलन्स एम.एच.२९-९४९३ ने तिला जबर धडक दिली. यात ती जागीच ठार झाली. तर अपघातानंतर चालकाचे नियंत्रण गेल्याने अॅम्बुलन्सही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. सदर अॅम्बुलन्स शिवणी आरोग्य केंद्राची असून एका दुचाकी अपघातातील दोन जखमी तरुणांना यवतमाळच्या रुग्णालयात पोहोचवून परतीच्या प्रवासात असताना गावाजवळ हा अपघात घडला. घटनेनंतर चालक रमेश बापुराव शिंदे याने घाटंजी पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
अॅम्बुलन्सच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
By admin | Updated: October 7, 2015 02:52 IST