वंजारीफैलातील घटना : तीन दिवस मृत्यूशी झुंजयवतमाळ : वाढदिवसाच्या दिवशी वरणाच्या मोठ्या गंजात पडून एक चिमुकली गंभीररीत्या भाजली. तीन दिवस मृत्यूशी झुंज देऊन अखेर तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना यवतमाळच्या वंजारीफैलात घडली. सतत बडबड करणारी आणि कुणाच्याही अंगाखांद्यावर खेळणाऱ्या चिमुकलीचा असा करुण अंत झाल्याने परिसरातील प्रत्येकाच्या हृदयाची कालवाकालव झाली. श्रेया मोहन ठाकरे (वय पाच वर्षे) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. खासगी चालक असलेले वडील मोहन आपल्या परिवारासह वंजारीफैलात एका घरी भाड्याने राहतात. श्रेया ही घरच्यांचीच नव्हे तर परिसरातील सर्वांची आवडती होती. तिचाच पाचवा वाढदिवस मंगळवारी आयोजित होता. त्यापूर्वी ठाकरे परिवार शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेला होता. दर्शनावरून परत आल्यानंतर परिसरातील नागरिकांसाठी वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी जेवणाचा बेत ठेवला. आई अलकाने प्रत्येकाच्या घरी जाऊन आग्रहाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी चिमुकली श्रेयाही आपल्या बोबड्या बोलातून सर्वांना आमंत्रण देत होती. वाढदिवसाची मंगळवारी सर्व तयारी सुरू होती. मोठ्या गंजांमध्ये भाजी आणि वरण शिजविले होते. शिजविलेले गंज अंगणात एका कोपऱ्यात झाकून ठेवलेले होते. दुपारी ४ वाजताच्या सुमारास सर्व मंडळी वाढदिवसाच्या तयारीत असताना श्रेया खेळत गंजावर जाऊन पडली. त्यामुळे झाकणी बाजूला सरकली आणि काही कळायच्या आत श्रेया गरम वरणात जाऊन पडली. हा प्रकार तेथे असलेल्या एका महिलेच्या लक्षात आला. तिने क्षणाचाही विलंब न लावता श्रेयाला बाहेर काढले. संपूर्ण अंगाला शिजविलेली डाळ चिकटली होती. या परिस्थितीत तिच्या अंगावर पाणी ओतून तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४० टक्के जळालेल्या श्रेयावर उपचार सुरू झाले. मात्र तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. इकडे मंगळवारी कुणीही अन्नाला हात लावला नाही. वाढदिवसाला आलेले नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. ती बरी व्हावी म्हणून अनेकांनी प्रार्थना केली. आईच्या डोळ्याला तर डोळाच लागला नाही. सतत अश्रूंच्या धारा वाहात होत्या. तिच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण वंजारीफैलात हळहळ व्यक्त होत आहे. श्रेया ही बोलकी असल्याने परिसरातील अनेकांच्या घरी जायची. तिचा अनेकांना लळा लागला होता. वाढदिवसाच्या दिवशीच अशी घटना घडून तिचा करुण अंत झाल्याने परिसरातील नागरिकांच्या डोळ्यातूनही अश्रूच्या धारा वाहात होत्या. (कार्यालय प्रतिनिधी)
वाढदिवशीच चिमुकलीचा वरणाच्या गंजात पडून मृत्यू
By admin | Updated: August 2, 2015 02:21 IST