शेगाव (बुलडाणा) : किरकोळ कारणावरुन ५ नोव्हेंबर रोजी दोन गटात झालेल्या हाणामारीच्या प्रकरणातील अटक असलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. सीआयडी पथकाने उत्तरीय तपासणीसाठी मृतदेहास यवतमाळ येथे हलविले आहे.शेगाव येथील टिपू सुलतान चौकात अमीरशाह महेमूदशाह व इकरारखा अहेमदखा या दोन गटामध्ये किरकोळ कारणावरुन ५ नोव्हेंबरला हाणामारी झाली होती. परस्पर तक्रारीवरून दोन्ही गटाच्या विरोधात शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेगाव पोलिसांनी आरोपी अमीरशाह, राजाशाह, चांदशाह व जावेदशाह यास ७ नोव्हेंबरला अटक केली व शेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयातच आरोपी चांद शाह सुभान शाह याची प्रकृती बिघडली. न्यायालयाने तात्काळ त्याला उपचारासाठी हलविण्याचे आदेश दिले. आरोपीला प्रथम शेगाव येथील जिवनज्योती हॉस्पिटल व नंतर अकोला येथे हलविण्यात आले. उपचार सुरु असताना सोमवारी रात्री ११.४५ वाजेच्या दरम्यान फातेमा हॉस्पिटल येथे चांदशहा सुभानशहा यांचा मृत्यू झाला. शहर पो.स्टे.चे ठाणेदार नंदकुमार शर्मा, ग्रामीण पो.स्टे.चे. ठाणेदार विजयकुमार आकोत, एपीआय पाटील यांनी अकोला येथील रुग्णालयात पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच सी.आय.डी. विभागाने दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली. मृतदेहास उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळला हलविले. तेथे व्हिडीओ चित्रिकरणात डॉक्टरांची चमू उत्तरीय तपासणी करणार आहे.
पोलिसांच्या अटकेतील आरोपीचा मृत्यू
By admin | Updated: November 12, 2014 00:17 IST