आर्णी तालुक्यातील प्रकार : ऐन वेळेवर नवरीच्या बहिणीशी लग्न आर्णी : लग्न ठरले. दोन्हीकडील मंडळी तयारीला लागली. लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला. मुलाच्या घरी आनंदाचे वातावरण होते. अशातच निरोप आला नियोजित वधूला पुत्ररत्न झाले. लग्नाच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडल्याने गोंधळ सुरू झाला. याच गोंधळात सग्यासोयऱ्यांनी मुलाचे लग्न नियोजित दिवशी नवरीच्या बहिणीशी लावून दिले. गत आठवड्यात घडलेल्या या प्रकाराची चर्चा संपूर्ण आर्णी तालुक्यात सुरू आहे. तालुक्यातील एका तरुणीचे लग्न ठरले. या लग्नासाठी दोन्हीकडील मंडळी जय्यत तयारीला लागली. लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला. इकडे मुलगा भावी आयुष्याचे स्वप्न रंगवू लागला. मात्र या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला. लग्नाच्या आदल्या दिवशी त्याच्या नियोजित वधूने एका मुलाला जन्म दिला. ही वार्ता नवरदेवाच्या घरी कळली. तेव्हा सर्वच सुन्न झाले. आता काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र नातेवाईकांनी पुढाकार घेतला. दोन्हीकडील मंडळींना एकत्र बसविले. त्यातून तोडगा काढला. नियोजित वधूच्या ऐवजी तिच्या लहान बहिणीसोबत सदर तरुणाचे हात पिवळे करून देण्याचा तो तोडगा होता. नियोजित दिवशी वरात मंडपात पोहोचली. नवरीच्या लहान बहिणीसोबत लग्नही लागले. इकडे पुत्ररत्न झालेली मोठी बहीण मामाच्या गावी रवाना करण्यात आली होती. लग्नातही याच प्रकाराची चर्चा होती. विशेष म्हणजे सदर मुलीचे गावाशेजारील एका विवाहित तरुणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातूनच तिला मुलगा झाला. मात्र आता सदर विवाहित तरुण ‘तो मी नव्हेच’ असे म्हणत असल्याची माहिती आहे. लग्नाआधी पुत्रप्राप्तीची चर्चा मात्र आर्णी तालुक्यात चांगलीच रंगते आहे. (तालुका प्रतिनिधी )
लग्नाच्या आदल्या दिवशीच पुत्ररत्न
By admin | Updated: May 20, 2015 00:26 IST