उमरखेड(कुपटी) : तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असून असंख्य रुग्ण आजही विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये डेंग्यूसदृश तापाची लागण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशा प्रकारचे २० बालक रुग्णालयात सध्या दाखल आहेत.एकीकडे मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण तालुक्यात वाढत असताना या तापावर नियंत्रण मिळविण्यामध्ये आरोग्य यंत्रणा अपुरी पउत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना, जनजागृती आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत नाही. तसेच लोकप्रतिनिधीसुद्धा या बाबतीत पूर्णपणे उदासीन असल्याचे दिसून येत आहे. काही लोकप्रतिनिधींनी तालुक्यातील या साथीच्या आजारांचा आणि त्यावर सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत अद्याप आढावा घेतलेला नाही. याचाच परिणाम म्हणून डेंग्यूचा प्रकोप वाढतच आहे. उमरखेड शासकीय रुग्णालयात गेल्या दोन दिवसात ऋषिकेश दिवेकर, आकाश भोजरे, सपना सलीम, नलिनी वाहुळे, साधना उगले, दीपाली शिमरे, कृष्णा शिमरे, स्वाती शिनगनकर, अंकिता खंडाळे आणि इतर असे २० लहान मुलांना दाखल करण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे ही सर्व मुले ११ वर्षाच्या आतील वयोगटातील आहे. परंतु शासकीय रुग्णालयात या तापावर नियंत्रण मिळण्यासाठी लागणारी औषधी, सलाईन व इतर साधने नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. जे औषधी आहे त्यावरच उपचार सुरू आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता या रुग्णांवर उपचार करीत असलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. डेंग्यूच्या तापाचे प्रमाण लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. परंतु उमरखेड शासकीय रुग्णालय व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधाच रुग्णांसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना नाईलाजास्तव खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावा लागत आहे. उमरखेडसह ढाणकी, मुळावा आदी ठिकाणच्या खासगी रुग्णलयांमध्येसुद्धा बाल रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांची सर्रास लूट सुरू असल्याचेसुद्धा दिसून येत आहे. काही ठिकाणी साधा ताप जरी असला तरीसुद्धा रुग्णांना डेंग्यूची लक्षणे असल्याचे सांगून घाबरून देण्यात येत आहे. रुग्णालयात उपचार करण्यासाठी अनेक ठिकाणी डॉक्टरसुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आरोग्यसेवकांच्या भरवशावर उपचार घ्यावे लागत आहेत. ज्यांना शक्य आहे असे रुग्ण यवतमाळ, नांदेड व इतर ठिकाणी उपचारार्थ जात आहेत. परंतु गोरगरीब रुग्णांना तालुक्यातीलच शासकीय आरोग्य सेवेवर अवलंबून राहिल्याशिवाय पर्याय नाही. (वार्ताहर)
डेंग्यूचे प्रमाण बालकांमध्ये अधिक
By admin | Updated: November 8, 2014 22:45 IST