के.एस. वर्मा - राळेगावसुमारे १२ हजार कोटी रुपये खर्च करून महत्त्वाकांक्षी बेंबळा प्रकल्प पूर्ण झाला. मात्र कालव्याच्या पूर्णत्वाअभावी सिंचनाचे ४० हजार हेक्टरचे लक्ष्य अपूर्ण आहे. यावर्षी तर केवळ आठ हजार हेक्टर क्षेत्रालाच पाणी मिळणार आहे. त्यामुळे सन १९८० च्या दशकापासून सिंचनाचे व त्यातून समृद्धीचे स्वप्न पाहणाऱ्या आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, याची अनिश्चितता आहे.बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव या तालुक्यातील १७५ गावातील २० हजार शेतकऱ्यांना स्वप्न पूर्ण होण्याची प्रतीक्षा आहे. प्रकल्प, कालव्याचे काम सुरू करताना ५३ हजार ५६० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होईल, एकूण ७५ टक्के म्हणजे ४० हजार हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष सिंचन होवू शकेल, अशी आशा निर्माण करण्यात आली होती. आज ३०-३४ वर्षांच्या प्रचंड कालावधीनंतरही धरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कालवे व उपकालव्याचे काम केवळ ७० टक्के झाले आहे.राळेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या किन्ही(जवादे), दहेगावपर्यंत कालवे खोदून झाले. अस्तरीकरणाचे काम, उपकालव्याचे काम अजूनही सुरूच आहे. मारेगाव तालुक्यात यास गती मिळण्याची प्रतीक्षा आहे. यावर्षी या विभागाने आठ हजार हेक्टर क्षेत्रात पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. गतवर्षी ते केवळ चार हजार हेक्टरच होते. लक्ष्याच्या तुलनेत प्रत्यक्ष साध्यता ही केवळ २० टक्के इतकी अल्प असल्याने सिंचनातून प्रगती साधण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
धरण पूर्ण, पण कालव्याचा खोडा
By admin | Updated: December 10, 2014 23:06 IST