काशीनाथ लाहोरे - यवतमाळमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सोयीसुविधांचा वापर चुकीच्या मार्गाने होत असल्याने यवतमाळसह राज्यभरात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस दलात तज्ज्ञांची वाणवा आहे. पर्यायाने सायबर क्राईमशी संबंधित तक्रार आल्यास शक्यतोवर ती दाखल होणार नाही, असाच प्रयत्न होताना दिसतो. समाजात सायबर क्राईमचे अनेक प्रकार घडतात. मात्र बोटावर मोजण्याऐवढ्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचतात. आंतरराष्ट्रीय नियमाने २००० साली सायबर लॉचा कायद्यात समावेश करण्यात आला असून २००७-०८ पासून वकिलांच्या शिक्षणात सायबर लॉचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेल्या गुन्ह्यांचे आणि त्यांच्या विविधतेचे प्रकार पाहिले की उच्च शिक्षणाची आवश्यकता भासते. विधीज्ञांना पदव्युत्तर सायबर लॉचे शिक्षण देणारी पदविका महाविद्यालये पुणे मुंबईत आहेत. परंतु पदव्युत्तर पदवी देणारी दोनच विद्यापीठे महाराष्ट्रात असून ती दोनही विदर्भात आहेत हे विशेष. राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठ नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली याच विद्यापीठातून विधी पदवीनंतर मास्टर आॅफ सायबर लॉ अॅन्ड इन्फार्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी प्राप्त करण्याची सोय आहे. पोलीस खात्यांमध्ये देखील सायबर लॉबाबत फारशी जागृती नसल्याने त्यांनाही खासगी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते. आज भारतात ४५०० सायबर तज्ज्ञांची गरज असताना जेमतेम ७०० सायबर तज्ज्ञ आहेत. परिणामी गुन्ह्यांची व्यवस्थित नोंद होणे, न्यायालयात शिक्षा होण्याची प्रमाणे पाहिजे तेवढे नाही. तरुण वकिलांनी सायबर लॉमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली तर भविष्यात मोठी संधी मिळणार आहे.
सायबर गुन्हे वाढले, तज्ज्ञांची वाणवा
By admin | Updated: August 27, 2014 23:54 IST