प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : गोवा, राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातील कलावंतांचा सहभागपुसद : स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाच्यावतीने येथील यशवंत स्टेडियमवर सोमवारी बळीराजा चेतना अभियानांतर्गत पश्चिमालाप कार्यक्रम घेण्यात आला. यातून विविध संस्कृतीचे दर्शन घडले. या कार्यक्रमात महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान, गुजरात आदी राज्यातील कलावंतांनी सादर केलेल्या कलेने श्रोत्यांना थक्क करून सोडले. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष माधवी गुल्हाने, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, तहसीलदार डॉ.संजय गरकल, ठाणेदार अनिल कुरडकर, पंचायत समिती सभापती सुभाष कांबळे, उपसभापती विवेक मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, बी.जी. राठोड, रवींद्र महल्ले, जैनूल सिद्दीकी, मदन बडगुजर, आशा चव्हाण, माधुरी आसेगावकर, विस्तार अधिकारी प्रकाश घोडेकर आदी उपस्थित होते. पश्चिमालाप कार्यक्रमाची सुरुवात सांगली येथील कलावंतांनी गणपती वंदनाने केली. त्यानंतर शाहीर अनंतकुमार सोळंके यांनी आपल्या पहाडी आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडा सादर करून प्रेक्षकांमध्ये स्फूर्ती जागविली. बळीराजामधील नैराश्य दूर व्हावे, त्यांना स्फूर्ती मिळावी व त्यांचे मनोधैर्य उंचवावे, या हेतूने सादर केलेल्या पोवाड्यातून बळीराजाला उभारी मिळण्यास मदत झाली. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय न घेता परिस्थितीशी दोन हात करा, असा संदेश या पोवाड्यातून देण्यात आला. गोवा येथील कलावंतांनी समई नृत्य सादर केले. यामध्ये चार ते पाच किलो वजन असलेल्या पितळी समई डोक्यावर घेवून शरीराचे संतुलन साधत त्यांनी गीत सादर केले. राजस्थान येथील हिरानाथ कालबेलिया व समूहाने चेरी नृत्य एकाग्रता व संतुलन ठेवून सादर केले. हे नृत्य पाहताना प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकला. श्रोत्यांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटासह या नृत्याला दाद दिली. त्यानंतर राजस्थानी कलावंतांनी भवाई नृत्य सादर केले. खऱ्या अर्थाने रंगत आणली ती लावणी नृत्याने. महाराष्ट्राची लोककला असलेल्या या लावणी नृत्यावर प्रेक्षक आपोआपच थिरकायला लागले. एकंदरीत बळीराजा चेतना अभियानांतर्गत पश्चिमालाप कार्यक्रमातून भारतीय संस्कृती व सामाजिक परंपरेचे दर्शन प्रेक्षकांना झाले. तसेच शेतकऱ्यांना यातून सकारात्मक संदेश देण्याचेही काम करण्यात आले. (प्रतिनिधी)