घाटंजी : कोणतेही काम करताना, योजना राबविताना ती योग्यरीत्या राबविली आणि मनापासून केली, तर निश्चितच फलदायी ठरते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे, जरूर येथील शेततळे आहे. आजही हे शेततळे अर्धेअधिक भरलेले आहे. मे महिन्यातही यात पाणी असते. एकीकडे उन्हाळा लागण्यापूर्वीच नदी-नाले कोरडे पडतात. विहिरीही आटतात. इतर ठिकाणचे शेततळे केव्हाचेच कोरडे पडले आहे. पण, जरूरच्या शेततळ्याचे गुपितच सारासार विचार करून योजनाबद्धरीतीने तयार करण्यात आले. मोरेश्वर वातीले या शेतकऱ्याच्या कल्पक बुद्धितून त्यांनी त्यांच्या शेतात हे शेततळे तयार केले आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर ८२ हजार २४० रुपये खर्च करून ३० फूट लांब, ३० फूट रूंद व १५ फूट उतार खोली असे त्याचे बांधकाम आहे. हे शेततळे टेकडीच्या पायथ्याशी आहे. टेकडीवरील पावसाचे पाणी सरळ या शेततळ्यात साठविले जाते आणि ते मे महिन्यापर्यंत पुरते. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गुरांसाठी पाणी, फवारणीसाठी पाणी उपलब्ध होते. या पाण्यावर शेतमालक कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांना पाणी देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करत आहे. योजना आली म्हणून ती राबविली, पैसा आला, खर्च केला, असे न करता जीव ओतून भविष्याचा वेध घेत काम केले तर ती योजना, तो पैसा याचा निश्चितच फायदा होतो, असे मत मोरेश्वर वातीले यांनी व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)
जरूर येथील शेततळे ‘जीवनदायी’
By admin | Updated: February 20, 2016 00:15 IST