यवतमाळ : पिकांवर किटकनाशक फवारताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या 19 शेतक-यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले होते. परंतु यावेळी त्यांना शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागला. घाटंजी तालुक्यातील मानोली या गावात शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी फुंडकर यांच्या ताफ्यातील वाहनांवर कापसाची झाडे फेकून आपला रोष व्यक्त केला.
फुंडकर हे पालकमंत्री मदन येरावार यांच्या समवेत मानोली येथे मृत शेतक-याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचा ताफा गावात येताच शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख देवानंद पवार यांनी या ताफ्यावर कापसाची झाडे फेकली. ''एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी मृत्यूमुखी पडत असताना शासनाचे अद्याप काहीच धोरण ठरलेले नाही. धोरण ठरवण्यासाठी आणखी किती मोठा मृत्यूचा आकडा हवा'', असा जाब पवार यांनी विचारला असता पालकमंत्री मदन येरावार व पवार यांच्यात हमरीतुमरी झाली.
पोलिसांनी पवार यांना ताब्यात घेतले. यावेळी मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनीही कृषिमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कृषिमंत्र्यांवर किटकनाशक फवारणीचाही प्रयत्न
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या शासकीय महाविद्यालय यवतमाळ येथील भेटीदरम्यान त्यांच्यावर किटकनाशक फवारणी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यवतमाळ मनविसे जिल्हा अध्यक्ष अनिल हमदापुरे , मनसे जिल्हा उपाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित नानवटकर यांना अटक करण्यात आली आहे.