भूमि अभिलेखचा कारभार : दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने दिलासा पुसद : तुकडेबंदी व एकत्रिकरण योजनेत भूमिअभिलेख कार्यालयात झालेली चूक दुरुस्त होण्यास तब्बल ३४ वर्षाची प्रतीक्षा एका शेतकऱ्याला करावी लागली. पुसद येथील दिवाणी न्यायालयाने चूक दुरुस्त करण्याचे आदेश दिल्याने महागाव तालुक्यातील भांब येथील एका शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे.भांब येथील शेतकरी बाबूराव कांबळे यांच्याकडे १४ हेक्टर ३८ आर ही वडिलोपार्जित जमीन होती. त्यापैकी दोन हेक्टर ८७ आर जमीन त्यांनी भाऊराव पंडागळे यांना १९७५ साली विकली. त्यानंतर १९८१ मध्ये तुकडेबंदी व एकत्रीकरण योजनेत घोळ होऊन २ हेक्टर ८७ ऐवजी चार हेक्टर पाच आर जमीन भाऊराव पंडागळे यांच्या नावे भूमिअभिलेख कार्यालयात नोंदविली. भूमिअभिलेखने केलेली चूक दुरुस्त करण्यासाठी बाबूराव कांबळे यांनी वारंवार निवेदने दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, आयुक्त आणि उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु चूक दुरुस्त झाली नाही. भाऊराव पंडागळे यांच्या वारसांनी दोन हेक्टर ८७ आर जमीन वेगवेगळ्या लोकांना विक्री केली. उर्वरित एक हेक्टर १८ आर जमीन गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने निलाबाई कांबळे यांना २००४ मध्ये विकली. यानंतर बाबूराव कांबळे यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून निलाबाई कांबळेचे खरेदी खत रद्द करून योजनेतील चूक दुरुस्त करण्याची मागणी केली. सर्व पुरावे व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पुसद दिवाणी न्यायालयाने या प्रकरणात सदर शेतकऱ्याची याचिका मान्य करीत भूमिअभिलेखला चूक दुरुस्तीचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
३४ वर्षांनंतर चूक दुरुस्त
By admin | Updated: October 7, 2015 02:53 IST