लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दुर्गम ठिकाणी एका मंदिरात कोरोनाचे नियम डावलून लग्न लावले जात आहे, अशी गुप्त खबर प्रशासनाला मिळाली. त्यावरून कारवाईसाठी धडकलेल्या अधिकाऱ्यांपुढे भलताच प्रकार आला. कोरोनाचे नियम तर डावलले गेलेच, पण लग्नातील नवरी मुलगीही अल्पवयीन निघाली. त्यामुळे या प्रकरणात गर्दी करणे व अल्पवयीन मुलीचा विवाह लावणे आदी बाबीसंदर्भात सहा जणांवर खंडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमा भागात मंगळवारी हा प्रकार घडला. पांढुर्णा गावातील एका मंदिरात बालविवाह होत असल्याची माहिती हिंगोली जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. त्या आधारे त्यांचे अधिकारी व हिंगोली पोलीस यांनी विवाहस्थळ गाठले. मात्र तोपर्यंत विवाह संपन्न झाला. घटना यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत घडल्याने पुसद तालुक्यातील खंडाळा पोलिसांना माहिती देण्यात आली. यवतमाळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात खंडाळाचे ठाणेदार गोपाल चावडीकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर घटनास्थळी पोहोचले. ग्रामसेवक पांडुरंग बुरकुले यांनी फिर्याद दिल्यानंतर यात ३० वर्षीय नवरदेव, लग्न जुळविणारे व लग्न लावून देणारे अशा व्यक्तींवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच कोरोना काळात गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईसाठी यवतमाळ बाल संरक्षण कक्षाचे महेश हळदे, माधुरी पावडे, सुनिल बोकसे, हिंगोली येथील बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी सहकार्य केले.केदारलिंगी मंदिरात झालेल्या या लग्नाला ७० ते ८० लोक उपस्थित असल्याचे ग्रामसेवकांनी फिर्यादीत म्हटले आहे. या अज्ञातांचाही आता पोलिसांमार्फत माग काढला जाण्याची शक्यता आहे.
रोखायला गेले कोरोना, सापडला बालविवाह; सहा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST