यवतमाळ : शासनाच्या अनेक योजना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावरच सुरू असून आता इंदिरा आवास योजनेतील घरकूल वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती केली जात आहे. या अभियंत्याकडून आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी आत घरकूूल पूर्ण करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी कंत्राटी अभिंयत्यांचा शोध जिल्हा परिषदेने चालविला आहे. कंत्राटी अभियंत्याला घरकुलाच्या मूल्यमापनासाठी टप्याटप्यावर विशिष्ट सेवा शुल्क दिले जाणार आहे. एका घरकुलासाठी अभियंत्याला केवळ एक हजार रुपये मोबदला मिळणार आहे. अशा प्रकारे एका अभियंत्याकडे ५०० पेक्षा अधिक घरकुलाच्या मूल्यमापनाचे काम देण्यात येऊ, नये असे निर्देश आहे. जिल्ह्यात इंदिरा आवास योजनेतून १४ हजार घरकूल तयार करण्यात येणार आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीस्तरावरून अभियंत्याचे मिळणारे असहकार्य कारणीभूत मानले जात होते. पंचायत समितीस्तरावर असलेल्या एक किंवा दोन अभियंत्यावरच सर्व योजनेचा भार राहत होता. त्यामुळे घरकुलाच्या कामाचे वेळेत मूल्यमापन केले जात नव्हते. परिणामी घरकुलाच्या बांधकाम खर्चात वाढ होत होती. हीच अडचण दूर करण्यासाठी कंत्राटी अभियंत्याकडून घरकुलाचे काम करून घेण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. सेवानिवृत्त अभियंत्याकडून ही योजना पूर्ण करून घेण्याकडे कल आहे. त्यासाठी सेवानिवृत्त अभियंत्यांच्या शोध सुरू आहे. मात्र अतिशय तोकडा मोबदला मिळणार असल्याने अनेकांनी या कामाकडे पाठ फिरविली आहे. (कार्यालय प्रतिनिधी) फरफट थांबविण्याचा प्रयत्नजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून घरकुलाच्या विविध योजना राबविण्यात येतात. पंचायत समितीस्तरावरून प्रत्यक्षात या योजनांवर नियंत्रण ठेवले जाते. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाने तालुका ते जिल्हा मुख्यालय अशी लाभार्थ्यांची फरफट होते. हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न होत आहे.
घरकूल योजनेसाठी कंत्राटी अभियंते
By admin | Updated: March 29, 2015 00:03 IST