पुसदमध्ये बांधकाम विकास रोडावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:00 AM2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:15+5:30

पुसदला गेल्या दीड वर्षांपासून सहायक अभियंता (श्रेणी-१) आहेत. पुसदमधील बांधकाम विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षात पुसदला मिळणाऱ्या निधीत बरीच कपात झाल्याचे सांगितले जाते. हा निधी मिळावा म्हणून सदर उपअभियंत्याने तीनही आमदारांकडे अ‍ॅप्रोच वाढविणे, समन्वय साधणे, निधीची मागणी करणे, निधी आणण्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.

Construction development stalled in Pusad | पुसदमध्ये बांधकाम विकास रोडावला

पुसदमध्ये बांधकाम विकास रोडावला

Next
ठळक मुद्देउपअभियंत्यावर अनास्थेचा ठपका : महागाव, उमरखेडमध्ये मात्र अधिक कामे

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शहरात तीन पक्षाचे तीन आमदार असूनही बांधकाम क्षेत्रात तेवढा विकास होताना व तेवढा निधी येताना दिसत नाही. या मागे पुसदच्या बांधकाम उपअभियंत्याचा आमदारांशी प्रॉपर अ‍ॅप्रोच नाही, अनास्था आहे असा सूर ऐकायला मिळतो आहे.
पुसदला गेल्या दीड वर्षांपासून सहायक अभियंता (श्रेणी-१) आहेत. पुसदमधील बांधकाम विकासाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षात पुसदला मिळणाऱ्या निधीत बरीच कपात झाल्याचे सांगितले जाते. हा निधी मिळावा म्हणून सदर उपअभियंत्याने तीनही आमदारांकडे अ‍ॅप्रोच वाढविणे, समन्वय साधणे, निधीची मागणी करणे, निधी आणण्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात यात सदर अभियंता बरेच मागे पडत असल्याचे सांगितले जाते. कार्यालयात उशिरा येणे, साईडवर न जाणे यावरच त्यांचा भर राहत असल्याची ओरड आहे. पुसदच्या तुलनेत उमरखेड, महागाव उपविभागात मात्र अधिक विकास कामे होताना दिसतात. पुसद मतदारसंघातील परंतु महागाव तालुक्यातील काळी दौलत येथे भाजप विधान परिषद सदस्यांनी निधी दिला. पोफाळी येथेही कामे सुरु आहेत.
हायब्रीड अ‍ॅन्युईटी अंतर्गत शेंबाळपिंपरी ते पुसद-माहूर रोड फाटा, माहूर-सिंगद ही कामे पुसद उपविभागात सुरू आहे. मात्र या कामांची गती संथ आहे. कंत्राटदाराच्या सोईने ही कामे चालविली जात आहे. रस्त्यावर खड्डे आहेत, पावसाळ्यात स्थिती आणखी गंभीर आहे. मात्र त्यानंतरही खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदाराला सांगितले जात नाही. त्याचा त्रास जनतेला होतो आहे. या उलट याच कंत्राटदाराचे कारंजा उपविभागांतर्गत मानोरा-मंगरुळ तसेच घाटंजी तालुका व नेर-दारव्हा ही कामे सुरू आहेत. तेथे मात्र पुसदच्या तुलनेत गती चांगली असल्याचे सांगितले जाते. या कंत्राटदाराच्या पुसदमधील कामाच्या संथगतीवर राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांनी तारांकित प्रश्नही उपस्थित केला होता. या कामाची प्रगती व त्यातील चुकीचे प्रकार थांबविण्याची जबाबदारी उपअभियंत्यावर आहे. डे-टू-डे क्रॉस चेकिंग त्यांच्याकडून अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात ते होताना दिसत नाही. याच उपअभियंत्याकडे एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून सुरू असलेल्या पुसद-वाशिम रस्त्याचे काम आहे. त्याचीही प्रगती संथ असल्याचे सांगितले जाते.

उपअभियंत्याचे दुर्लक्ष वरिष्ठांना मात्र त्रास
वास्तविक उपअभियंत्याने दररोज साईटला भेट करून मोजमापाची क्रॉस तपासणी, चांगल्या-वाईट बाबींची माहिती वरिष्ठांना देणे बंधनकारक आहे. मात्र पुसदचे उपअभियंता यात फेल ठरल्याचे सांगितले जाते. त्याचा रोष मात्र बांधकाम खात्याच्या वरिष्ठांना सहन करावा लागत आहे. राजकीय स्तरावरूनही या अभियंत्याच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत कार्यकर्त्यांमधून सातत्याने ओरड ऐकायला मिळते. परिसरातील कामांना गती देण्यासाठी उपअभियंत्याची कार्यपद्धती गतीमान करण्याची मागणी सर्वस्तरातून केली जात आहे.

Web Title: Construction development stalled in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.