सूरज पाटील लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी मिळण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या प्रशिक्षणात प्रत्येक तासिकेनंतर ऑनलाइन मूल्यमापन करण्यात येत आहे. लिंक ओपन होत नसल्याने तांत्रिक अडचणीमुळे गोंधळ होत आहे. प्रशिक्षणाच्या ठिकाणी सोयीसुविधांचा अभाव असल्याची शिक्षकांची ओरड आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दोन जूनपासून प्रशिक्षण सुरू झाले असून, १२ जूनपर्यंत चालणार आहे. यवतमाळातील गोदणी व आर्णी मार्गावरील एका शाळेत प्रशिक्षण सुरू आहे. आर्णी मार्गावर जवळपास हॉटेल नसल्याने शिक्षकांची मोठी गैरसोय होत आहे. दोन्ही ठिकाणच्या प्रशिक्षणात एक हजार १६५ शिक्षकांचा समावेश आहे. नोंदणीसाठी प्रत्येकाकडून दोन हजार याप्रमाणे रक्कम गोळा करण्यात आली. सकाळी ९:३० ते सायंकाळी ५:३० प्रशिक्षणाची वेळ असताना चहा, नाश्ता, जेवण कशाची सोय करण्यात आली नाही. १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व २४ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी मिळण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणात प्रत्येक तासिकेनंतर उपस्थिती व ऑनलाइन मूल्यमापनाची सक्ती आहे. मात्र मूल्यमापनासाठी लिंक ओपन होत नसल्याने ऑनलाइन कामातच शिक्षकांचा अधिक वेळ जात आहे.
परीक्षाही देता येत नाहीदोन बॅचमध्ये प्रशिक्षण सुरू असून, एक गोदणी रोड विद्यालयात, तर दुसरे आणी रोडवरील शाळेत आहे. येथे शिक्षकांना चहापाणी किंवा नाश्ता करण्यासाठी लांब जावे लागते. प्रत्येक तासिकेनंतर उपस्थिती म्हणून स्वाक्षरी घेतली जाते. ही अट किचकट आहे. परीक्षेची लिंक ओपन होत नसल्यामुळे शिक्षकांना अडचण होत आहे. प्रत्येक तासिकेनंतर दहा मिनिटांची परीक्षा होत असते. लिंक ओपन होत नसल्याने शिक्षकांना परीक्षा देता येत नाही.
उपस्थित असतानाही गैरहजर५० शिक्षकांची एक बॅच आहे. प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांची ऑनलाइन व ऑफलाइन हजेरी घेतली जाते. बुधवारी गोदणी येथे प्रशिक्षणादरम्यान एका महिला अधिकाऱ्याने शिक्षकांची स्वाक्षरी पूर्ण होण्यापूर्वीच कागद घेऊन काढता पाय घेतला. हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतरही दाद दिली नाही, असा शिक्षकांचा आरोप आहे. गुरुवारी ३२ जणांचीच लिस्ट आली. यामुळे उपस्थित असताना गैरहजर दिसत असल्याने प्रशिक्षणाचा फायदा काय, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला.
"हजारो शिक्षक प्रशिक्षणात सहभागी असल्याने दोन दिवस तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. अडचणी पुणे येथून दूर केल्या जात आहेत. प्रशिक्षणाला उपस्थित असणाऱ्या कोणत्याही शिक्षकावर अन्याय होणार नाही."- डॉ. प्रशांत गावंडे, प्राचार्य, डायट, यवतमाळ.