लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या टाॅप दीडशे प्रकरणात सुमारे शंभर कोटी रुपयांचे कर्ज बुडित आहे. या कर्जाच्या वसुलीसाठी सक्तीने कारवाई करण्याचा निर्णय बुधवारी बॅंकेच्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आला. दीडशे प्रमुख मोठ्या प्रकरणातील शंभर कोटींची रक्कम ‘एनपीए’ (संभाव्य बुडित) झाली आहे. त्यामुळेच ‘एनपीए’चा आकडा कमालीचा वाढला होता. सध्या हा ‘एनपीए’ २९ टक्क्यांवर आला असून आणखी कमी करण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी मोठ्या प्रकरणातील रकमा वसुलीचे धोरण ठरविण्यासाठी दोन दिवस संचालक मंडळाची विशेष बैठक पार पडली. संचालक राजूदास जाधव या वसुली व विशेष बैठकीसाठी आग्रही असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम आणि जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे. सर्वच कर्ज प्रकरणात सक्तीची कारवाई करून धडक वसुली करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक मोठ्या कर्जदारांशी संपर्क करून वसुलीचे अधिकार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. बीगर शेती कर्जासाठी बॅंकेकडे तारण असलेल्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्याचे ठरले. व्याजात सूट देण्यासाठी सुधारित सामोपचार कर्ज परतफेड योजना तयार करण्यात आली आहे. त्याचा लाभ घेऊन थकीत कर्जदार सभासदांनी कर्जाचा भरणा करावा, असे आवाहन बॅंकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे यांनी केले. या वसुलीसाठी उपाध्यक्ष वसंत घुईखेडकरसुद्धा आग्रही असल्याचे बॅंकेच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.
आर्णी शाखेतील गैरव्यवहारात फौजदारी कारवाई जिल्हा बॅंकेच्या आर्णी शाखेतील गैरव्यवहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्याची दखल घेऊन बुधवारी महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित करण्यात आले. तर कंत्राटी लिपिकाची सेवा संपुष्टात आणण्यात आली. संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संचालकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चालक व इतर काहींच्या हालचाली संशयास्पद दिसत आहे. पोत्यामध्ये ३० लाखांची रोकड आणल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे. त्यामुळे या चालकासह इतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात येतील, असे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी स्पष्ट केले. या बॅंकेच्या एकूणच कारभाराची ‘सीए’ची नेमणूक करून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान आर्णीच्या या प्रकरणात बुधवारीही एका संचालकाने संशयितांची पाठ राखण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी जुन्या संचालक मंडळावर खापरही फोडण्यात आले.
ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही - कोंगरे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बॅंकेच्या आर्णी शाखेत उघडकीस आलेला प्रकार गंभीर आहे. मात्र त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही. दोषींना कितीही मोठ्या व्यक्तीचे पाठबळ असले तरी कारवाई होईलच. त्यामुळे ग्राहकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. त्यांच्या रकमा सुरक्षित आहे. ग्राहकांचा विश्वास कायम रहावा म्हणूनच निलंबनासारखी कठोर कारवाई करण्यात आली आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे नोंदविले जाणार असल्याचेही कोंगरे यांनी सांगितले.