वणी : येथील नगराध्यक्षा प्रिया लभाने यांनी निवडणुकीच्या वेळी खोटे प्रतिज्ञापत्र करून दिल्याची तक्रार त्यांच्या प्रतिस्पर्धी नगरसेवक उमेदवार करूणा कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.गेल्या जुलै महिन्यात येथील नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिला नगरसेवकांसाठी आरक्षित होते. त्यामुळे त्यावेळी प्रिया लभाने व करूणा कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. करूणा कांबळे यांनी स्वत: नामांकन अर्ज दाखल केला. प्रिया लभाने यांचा अर्ज नगरसेवक धनंजय त्र्यंबके यांनी दाखल केला होता. त्यावेळी प्रिया लभाने यांच्या खोट्या स्वाक्षरीने अर्ज दाखल केल्याची तक्रार करूणा कांबळे यांनी केल्याने प्रिया लभाने यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला होता. त्यावर प्रिया लभाने यांनी आयुक्तांकडे अपिल दाखल करून अर्जावरील स्वाक्षरी माझीच असल्याचे कबूल केल्याने करूणा कांबळे यांचे अपिल फेटाळण्यात आले व प्रिया लभाने नगराध्यक्षपदी बहुमताने निवडल्या गेल्या. मात्र अर्ज भरण्याच्या एक दिवसपूर्वीच प्रिया लभाने यांचे एका कंत्राटदाराने अपहरण केल्याची तक्रार त्यांच्या सासूने पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावेळेही माझे कुणीही अपहरण केले नव्हते, मी अर्ज भरण्याच्या दिवशी वणीतच हजर होते, मला मुलांना शाळेतून आणण्यासाठी शाळेत जायचे असल्याने माझा नामांकन अर्ज धनंजय त्र्यंबके यांच्याकडे दिल्याचे लभाने यांनी शपथपत्रात नमूद केले होते. प्रिया लभाने नामांकन भरण्याच्या वेळी मुलांना शाळेतून आणण्यासाठी शाळेत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्यांची तीनही मुले त्या दिवशी शाळेत गैरहजर असल्याचा पुरावा कांबळे यांनी मिळविला. तसेच त्या दिवशी लभाने नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात आरोग्य तपासणीसाठी गेल्या होत्या, अशी नोंदही रूग्णालयात असल्याचा पुरावा कांबळे यांनी मिळविला आहे. त्यामुळे लभाने यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने मला नगराध्यक्ष पदापासून वंचित ठेवले, अशी तक्रार कांबळे यांनी केली. प्रिया लभाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याची तक्रार
By admin | Updated: February 19, 2015 00:12 IST