लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पावसाअभावी वणी शहरातून वाहणारी निर्गुडा नदी पुन्हा एकदा कोरडी पडली आहे. नजीकच्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास वणी शहरात पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेता नवरगाव धरणातून ०.२० दलघमी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र वणी नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. मात्र यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप निर्णय न आल्याने चिंता वाढली आहे.१५ कोटी रूपये खर्च करून रांगणा-भूरकी येथील वर्धा नदीच्या डोहावर वणी शहरासाठी पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. येत्या एक-दोन दिवसात ट्रायल बेसवर या पाणी पुरवठा योजनेचे पाणी वणीपर्यंत आणण्याचे प्रयत्न नगरपालिकेच्यावतीने सुरू आहे. त्यात यश आल्यास वणीकरांचा पाणी प्रश्न तात्पूरता सुटण्याची शक्यता आहे. ७ जून ते १० जूनदरम्यान या परिसरात समाधानकारक पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने कायम हुलकावणी दिली. अधूनमधून रिमझीम पावसाने हजेरी लावली असली तरी त्यामुळे नदी किंवा नाल्यांच्या पाण्याची पातळी वाढली नाही. संपूर्ण जून महिना लोटला. मात्र अद्यापही निर्गुडा कोरडी आहे.त्यातच पावसाअभावी नवरगाव येथील धरणाचीदेखिल पातळी वाढली नाही. आणीबाणीच्या प्रसंगावर मात करण्यासाठी या धरणात एक दलघमी पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. या आरक्षित पाण्यातून वणीसाठी पाणी सोडल्यास पाण्याचा प्रश्न तात्पूरता मिटणार आहे. मात्र अद्याप यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे वणीकरांची चिंता वाढली आहे. सध्या निर्गुडा नदीत असलेल्या पाण्याच्या भरवशावर चार दिवसातून एकदा नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र दोन दिवसांपासून तोही पुरवठा बंद झाला आहे.नवरगाव धरणातून ०.२० दलघमी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र पाठविले आहे. परंतु अद्याप निर्णय देण्यात आल नाही. रांगणा डोहातील पाणी येत्या दोन दिवसात वणीपर्यंत आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.- संदीप बोरकर,मुख्याधिकारी न.प.वणी
नवरगावच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:21 IST
पावसाअभावी वणी शहरातून वाहणारी निर्गुडा नदी पुन्हा एकदा कोरडी पडली आहे. नजीकच्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास वणी शहरात पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाई निर्माण होणार आहे.
नवरगावच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
ठळक मुद्देवणी नगरपालिका : पावसाअभावी निर्गुडेचे पुन्हा वाळवंट