स्वच्छतादूत : लग्नाच्या आहेरात मागितले शौचालयअविनाश साबापुरे यवतमाळस्वत:च्या लग्नात आहेर म्हणून ‘शौचालय’ मागणाऱ्या नेरच्या चैतालीला महाराष्ट्र शासनाने स्वच्छता अभियानाचे ‘ब्रॅण्ड अॅम्बेसिडर’ बनविले. आता तिला ‘क्लास वन’ अधिकाऱ्याप्रमाणे भत्ते देण्याचा निर्णयही शासनाने जाहीर केला आहे. चैतालीच्या या अनोख्या सन्मानामुळे जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर वेगवान होण्यास मदत होणार आहे.गेल्या वर्षी वाशिम जिल्ह्यातील चैताली राठोड या तरुणीचा नेर तालुक्यातील मोझर येथील देवेंद्र माकोडे या शेतकऱ्याशी विवाह झाला. तिच्या वडिलांकडेही गरिबी आणि सासरीही गरिबीच. अशावेळी लग्नातला अवाढव्य खर्च तर तिने टाळायला लावलाच; पण आहेरात इतर कोणत्याही वस्तू न मागता तिने वडिलांकडे ‘रेडीमेड शौचालया’ची मागणी केली. आज तिच्या सासरी हे शौचालय आले आहे. तिच्या या अनोख्या आहेरामुळे संपूर्ण राज्यात वैयक्तिक स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तिला शासनाची ‘स्वच्छतादूत’ बनविले. नगरविकास खात्याने सोमवारी घेतलेल्या निर्णयानुसार आता चैतालीला वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना देय असलेले भत्ते मिळणार आहेत. चैतालीसह सुवर्णा लोखंडे (सिन्नर) आणि संगीता आव्हाडे (वाशिम) यांनाही हे भत्ते मिळणार आहेत.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य स्तरावर व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावर जे जनजागृतीपर कार्यक्रम होतील, त्यात या स्वच्छतादूतांचा समावेश असेल. स्वच्छतादूत चैताली राठोड (माकोडे) अशा कार्यक्रमातून नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणार आहे. अशा कार्यक्रमाला जाताना राज्य शासनाच्या वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना जेवढा प्रवास भत्ता व दैनिक भत्ता मिळतो, तेवढा भत्ता चैतालीलाही मिळणार आहे. एका छोट्याशा खेड्यात सर्वसामान्य कुटुंबात राहूनही चैतालीने उत्तम गोष्टीचा ध्यास घेतला. त्यामुळेच ही सर्वसामान्य तरुणी आज ‘क्लास वन’च्या भत्त्यांसाठीच नव्हे तर देशपातळीवरील सन्मानालाही पात्र ठरली आहे.भत्त्याच्या बाबतीतला निर्णय अजूनपर्यंत आम्हाला कळविण्यात आलेला नाही. पण निर्णय चांगला आहे. आजवर स्वखर्चानेच कोणत्याही कार्यक्रमाला जात होते. आता अधिक जोमाने प्रबोधन करण्याची प्रेरणा मिळाली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेतील महिला सरपंचांच्या कार्यशाळेत गेले होते. नेरच्या नेहरु महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरातही गेले. आमच्या मोझर गावातही नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगतेच. पण परिस्थितीपायी शांत राहावे लागत आहे. आता शासन भत्ता देणार असल्याने मार्गदर्शनासाठी फिरणे सहज शक्य होईल.- चैताली राठोड (माकोडे), स्वच्छतादूत, मोझर
नेरच्या चैतालीला ‘क्लास वन’चे भत्ते
By admin | Updated: February 13, 2016 02:07 IST