घाटंजी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून घाटंजी येथे झालेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी घाटंजी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली.माजी नगरसेवक सतीश मलकापुरे यांच्या घरावर ६ एप्रिल रोजी हल्ला करून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार व समर्थकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र तीन दिवस होऊनही घाटंजी पोलिसांंनी एकाही आरोपीला अटक केली नाही. त्यामुळे या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी राम मंदिरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत गुरुवारी एक दिवसीय बंदचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारी शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. सकाळपासूनच घाटंजी शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली नाही. भाजपा, शिवसेना, व्यापारी, युवक काँग्रेस व काही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी राम मंदिर येथून मोर्चा काढला. हा मोर्चा पोलीस ठाण्यात पोहोचला. या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन, ठाणेदार भारत कांबळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. सदर हाणामारीच्या घटनेच्या दिवशी एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तो गुन्हा दाखल करून घेण्यास यावेळी बाध्य करण्यात आले. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चात भाजपाचे सतीश मलकापुरे, राजू सूचक, विष्णूपंत नामपेल्लीवार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गणेश उन्नरकर, सेनेचे विक्रम जयस्वाल आदींसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (लोकमत चमू)
हल्ल्याच्या निषेधार्थ घाटंजी शहरात कडकडीत बंद
By admin | Updated: April 10, 2015 00:11 IST