पुसद : तालुक्यातील चिलवाडी परिसरात झालेल्या वादळात प्रचंड नुकसान झाले. केळीचे पीक उद्ध्वस्त झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यासोबतच शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावरील टिनपत्रे उडाली.चार दिवसांपूर्वी प्रचंड वादळासह पाऊस झाला. यात चिलवाडी परिसरातील शेतकरी दीपक जाधव, सुरेश पाटील, पंकज कदम, कृष्णा पौळ, आर.डी. राठोड यांच्या शेतातील केळीचे पीक उद्ध्वस्त झाले. तसेच अनेक घरांवरील टिनपत्रे उडून गेली असून वृक्षही उन्मळून पडले होते. विजेचे खांब आणि ताराही तुटून पडल्या. तसेच पुसद शहरातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावरील ५० वर्षे जुने टिनपत्रे उडून गेली. त्यामुळे सदर कार्यालय वाहतूक शाखेच्या कार्यालयात तात्पुुरते हलविण्यात आले आहे. पुसद शहरातही मोठ्या प्रमाणात वृक्ष उन्मळून पडले होते. वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्वेक्षण करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
चिलवाडी परिसराला वादळाचा तडाखा
By admin | Updated: June 19, 2014 00:18 IST