रोकड सुरक्षित : गॅस कटरचा वापर, चोरटा सीसीटीव्हीत कैददारव्हा : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चिखली (रामनाथ) शाखेत चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने रोख सुरक्षित राहिली. गॅस कटरच्या वापराने तिजोरीतील कागदपत्रे मात्र जळून खाक झाली. विशेष म्हणजे बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्याचा चेहरा कैद झाला असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहे.दारव्हा-कारंजा मार्गावरील चिखली येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेची भिंत फोडून आतमध्ये प्रवेश केला. गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु मजबूत तिजोरी फोडण्यात यश आले नाही. मात्र गॅस कटरच्या वापराने तिजोरीतील सर्व कागदपत्रे जळाली. रोख सुरक्षित आहे. दरम्यान, या घटनेची माहिती रविवारी सकाळी बँक अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी तत्काळ दारव्हा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ठाणेदार सदानंद मानकर आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एका व्यक्तीचा चेहरा त्यामध्ये दिसला. मात्र या घटनेत आणखी काही जणांचा समावेश असावा, असा संशय व्यक्त केला. शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
चिखलीत जिल्हा बँक फोडली
By admin | Updated: April 19, 2015 23:59 IST